आमगाव-सालेकसा मार्गावरील वाघनदीवरील पुलाची दुरावस्था

0
12

आमगाव,दि.29ः-आमगाव ते सालेकसा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या मागार्नेच छत्तीसगडला जाणारी प्रवासी वाहने तसेच इतर वाहने मोठय़ा प्रमाणात ये-जा करीत असतात. मात्र, या मार्गावरील वाघनदीच्या पुलाची दुरवस्था झाली असून, या मार्गानेच जड वाहतूक होत असते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बर्‍याच दिवसांपासून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामालासुद्धा दीर्घ कालावधी लोटल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला गॅप पडलेली दिसून येते. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणार्‍यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस पडलेल्या भेगा पुलाच्या जिर्णतेकडील वाटचालीचा परिचय करून देतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रीत करून पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
या मार्गावरून जडवाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने पुलाची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. पावसाच्या दिवसांत नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढ असल्याने पुलास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.