पुतळे जाळून देचलीपेठावासीयांनी केला नक्षल सप्ताहाचा तीव्र निषेध

0
17

अहेरी ,दि.29- तालुक्यातील देचलीपेठा हे गाव नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. दरवर्षी देचलीपेठा परिसरात नक्षल सप्ताह सुरु होताच बंद पाळला जातो. यावर्षी मात्र हे चित्र उलटे झाले असून नागरिकांनीच नक्षलवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळे तयार करुन नक्षल विरोधी घोषणा देत नक्षल पुतळयाची जाळपोळ केली. नक्षल्यांनी सप्ताहादरम्यान पुकारलेल्या बंदचा तीव्र निषेध केला.देचलीपेठा परिसरात मोठ्या प्रमाणात गरीब आदिवासी जनता वास्तव्यास आहे. शेती व मजुरीशिवाय रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने या भागातील बरेच लोक आंध्रप्रदेश व इतर राज्यात रोजगाराकरीता जात असतात. या भागातील जंगल परिसरात अनेक वर्षांपासून नक्षलवादी वावरत आहेत. आदिवासींना भुलथापा देवुन वेळोवेळी बंद पुकारतात. त्यामुळे आदिवासीं नागरिकांना मिळणारा रोजगार बंद होतो. त्याचा विपरीत परिणाम वर्षभर आदिवासी कुटुंबांना भोगावा लागतो. यावर्षी तेंदू, बांबूचा रोजगारसुध्दा व्यवस्थितरीत्या न होवू शकल्याने जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे. नक्षल्यांनी सप्ताहादरम्यान बंद पुकारल्याने जनता चांगलीच वैतागली आहे. आजपर्यंतच्या काळात नक्षलवाद्यांनी अनेकदा बंद पुकारुन आदिवासींचे कोणतेही हित जोपासल्याचे दिसून येत नाही. तसेच खोट्या क्रांतीची स्वप्ने दाखवुन आदिवासी जनतेची दिशाभुल केलेली आहे.
नक्षलवाद्यांच्या खोटया क्रांतीमुळे आदिवासी नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. नक्षलवादी हे आदिवासी जनतेच्या विकासातील अडथळा असून आदिवासी व इतर सामान्य जनेतचा विकास हा लोकशाहीच्या मार्गाने होवू शकतो, हे या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिक नक्षल्यांच्या विरोधासाठी एकवटल्याचे दिसून येते. नक्षल सप्ताहाच्या काळात सामान्य जनतेची शेतीची कामे सुरु असतात. बंद सप्ताहामुळे शेतीची कामे रखडतात व शेतीच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. याचा आर्थिक फटका वर्षभर जनतेला सोसावा लागतो. रस्ते, पूल आदी बांधकामांना व वनविभागाच्या कामांना नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने वर्षभरात मजुरी मिळण्याचे कोणतेही साधन नसते. यामुळेच देचलीपेठा परिसरातील जनतेने नक्षलवाद्यांचे प्रतिकात्क पुतळे जाळुन नक्षल सप्ताहाचा निषेध नोंदवला आहे. यावेळी परिसरातील २०० ते २५० नागरिक उपस्थित होते.