मलेरियाने बहीण-भावाचा मृत्यू

0
16

आमगाव,दि.30ः- तालुक्यातील तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येत असलेल्या वाघडोंगरी (वाघाटोला) येथे मलेरियाचा प्रकोप वाढला आहे. मलेरियाने ग्रस्त बहीण- भावाचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. मलेरियामुळे गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महेश सोहनलाल उईके (२0) व संगीता उईके (१८) असे मृत बहीण-भावाचे नाव आहेत. या घटनेनंतर गावातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासून गावात आरोग्य विभागाच्या चमुने सर्वे सुरू केला आहे. जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे यांनी आरोग्य विभागाकडे वांरवार या आरोग्य केंद्रात अधिकारी कर्मचारीचे रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्याकडे कानाडोळा करण्यात आला.आणि अपुर्या कर्मचारीमुळे रुग्ण दगावू लागले आहेत.
मृतक महेश हा आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे मोलमजुरीचे काम करीत होता. तेथून आल्यावर त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. तद्नंतर त्याची बहीण संगीताचीही प्रकृती बिघडली. तिलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २४ जुलै रोजी संगीताचा मृत्यू झाला. त्यानंतर २६ जुलैला महेशचाही मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा अन्य आजाराने नाही तर मलेरियाने झाल्याचे जिल्हा मलेरिया विभागाने स्पष्ट केले. घटनेनंतर तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणार्‍या वाघाडोंगरी व वाघाटोला येथे आरोग्य विभागाच्या चमुने सर्वेक्षण करून गावातील सर्व नागरिकांची रक्त तपासणी केली असता गावात मोठय़ा प्रमाणात मलेरिया व डेंग्यू पसरविणारे एनाफिलीस डास आढळले आहेत. यामुळे औषधांची फवारणी करण्यात आली आहे. या मृत्युमुळे गावकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत