बाजार समिती जागेसाठी सभापती, संचालकांचे आमरण उपोषण

0
14

गोंदिया,दि.03 : सडक अर्जुनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड व गोदामासाठी १.८२ हेक्टर आर जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी मागील दोन वर्षांपासून शासन आणि प्रशासनाकडे केली. मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी न लागल्याने सभापती, उपसभापती व संचालकांनी गुरूवार (दि.२) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील गट क्रमांक ११३५ आराजी ५४.०२ हे.आर.पैकी ०.८० हेक्टर आर शासकीय जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीची इमारत आणि गोदाम बांधकामासाठी मंजूर करण्यात यावी. या मागणीचा प्रस्ताव अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी, सहायक संचालक नगर रचना, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. याला दोन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र प्रशासनाने यावर अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे पुन्हा हाच प्रस्ताव नागपूर विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. मात्र त्यांनी सुध्दा या प्रस्तावावर काहीच कारवाई केली नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती व गोदामासाठी जागा उपलब्ध नसल्याने बाजार समितीत येणार शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर ठेवावा लागतो. यामुळेच बरेचदा शेतकºयांचे नुकसान होत आहे. आधीच जिल्ह्यातील मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे.त्यातच प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे.त्यामुळे शासनाने याची दखल घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी सभापती व संचालकांनी गुरूवारी (दि.२) सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. सभापती अविनाश काशीवार, आनंदकुमार अग्रवाल, हिरालाल चव्हाण, मिताराम देशमुख, दिलीप गभणे, देवचंद तरोणे, रोशन बडोले, सुखदेव कोरे, मंगेश नागपुरे, वसंत गहाणे, रमेश अग्रवाल, देवेंद्र तुकर आदी आमरण उपोषणाला बसले आहे.