पोलीस बॉईज संघटनेचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

0
8

भंडारा,दि.09 : मोहाडी तालुक्यातील रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? या घटनेचा निषेध करण्यासाठी तथा या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यासह अन्य मागण्यांसाठी पोलिस बॉईज असोसिएशन व सेवानवृत्त पोलिस कर्मचारी, अधिकारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
१ आॅगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. यामध्ये एक अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. यातील एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. माफियांकडून पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. आज पोलिसांवरच असे हल्ले होत राहीले तर समाजाचे रक्षण कोण करेल? अशा घटनांमुळे पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल खचेल, अशी भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रेती माफियांनी चांगलाच उच्छाद माजविला असून ते कुणाचीही तमा बाळगत नाहीत. वारंवार होणाºया हल्ल्यांमुळे त्यांनी पोलिस आणि महसूल विभागालाच आव्हान दिले आहे. यावर आळा घालणे आवश्यक आहे.
रोहा येथील घटना निषेधार्थ असून या घटनेचा तपास सीआयडीला सोपविण्यात यावा, गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, घटनेच्या दिवशी उशिरा गुन्हा दाखल का झाला, याची चौकशी करण्यात यावी, जखमी पोलिस हवालदार मडामे यांना शासनाने सर्वाेतोपरी मदत करावी, पोलिसांवर होणाºया हल्ल्याकरीता जलदगती न्यायालय बनवावे, या मागणीसाठी पोलिस बॉईज व सेवानवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांमार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी इलमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव, सचिन नवखरे, पुंडलिक निखाडे, भोवते, कोरे, तरोणे, अमरसिंग राठोड, धनराज कोचे, रवि लांजेवार, पटले, मडावी, पुराम, तिरबुडे, ठोंबरे, दोनोडे, प्रमिला तिरपुडे, मनोरमा, पोलिस बॉईज असोसिएशनचे जयराम बावने, ज्ञानेश्वर वाघमारे, इंदू मडावी, वैभव आदमने, सचिन भोंडे, रोहीत हलमारे, सचिन बावने आदी उपस्थित होते.