जहाल नक्षलवादी पहाडसिंगने केले छत्तीसगड पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
7

गडचिरोली,दि.२३:: गेल्या दीड दशकापासून उत्तर गोंदिया-गडचिरोली जिल्ह्याचा सीमावर्ती भाग आपल्या हिंसक कारवायांनी हादरवून सोडणारा व सध्या मध्यप्रदेशातील बालाघाट परिसरात नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या कामात गुंतलेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग याने नुकतेच छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

२००३ मध्ये नक्षल चळवळीत दाखल झालेला जहाल नक्षलवादी पहाडसिंग आत्मसमर्पण करणार असल्याच्या बातम्या २०१४ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. २०१५ पर्यंत उत्तर गडचिरोली व गोंदिया विभागाचा कमांडर असलेल्या पहाडसिंगवर नंतर एमएमसी झोनची जबाबदारी सोपविण्यात आली. महाराष्ट्र,मध्यप्रदेश व छत्तीसगड अशी तीन राज्ये मिळून नक्षल्यांनी हा झोन तयार केला असून, गोंदिया, बालाघाट, राजनांदगाव व अन्य काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागाचा त्यात समावेश आहे. या झोनची जबाबदारी आल्यापासून तो बालाघाट परिसरातच नक्षल चळवळीचा विस्तार करण्याचे काम करीत होता. त्याच्या नावावर ६० पेक्षा जास्त गुन्हय़ांची नोंद असून, १५ वर्षांत त्याने अनेकांना ठार केले आहे. पोलिसांशी झालेल्या अनेक चकमकींमध्ये तो अग्रस्थानी राहिला आहे. गडचिरोली पोलिसांनी त्याच्यावर १६ लाखांचे, तर छत्तीसगड पोलिसांनी २५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.