परसोडी ग्रा. पं.चे सर्व सदस्य अपात्र

0
11

भंडारा,दि.24- परसोडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच पायउतार झाल्यानंतर आता सर्वसदस्य अपात्र ठरविण्यात आले आहे. आता ही ग्रामपंचायत पदाधिकारीविना ठरली असून फेरनिवडणूक घ्यावी लागणार आहे.सरपंच, उपसरपंच राहीलेले अर्जदार पंकज सुखदेवे व दर्शन फंदे यांनी ग्रामपंचायच्या ९ सदस्य, सचिव आणि खंडविकास अधिकारी यांच्याविरुद्धभंडारा येथील अप्पर जिल्हाधिकार्‍यांच्या न्यायालयात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-१(ज-५) अंतर्गत गैरअर्जदार यांना ग्रा. पं. सदस्य पदावरून अपात्र घोषित करण्याबाबत दि. १५ मे २0१८ रोजी प्रकरण दाखल केले होते.
गैअर्जदार ओमकाबन करण बहादूर थापा, कुलदिप उदयभान कावळे, शामकला चिमनलाल चकोले, जिजाबाई नामदेव बावनकुळे, कल्पना नरेश मोटघरे, ज्ञानेश्‍वर देवजी हटवार, कुंदा ईश्‍वर हटवार, कौशल्या धनराज हटवार, प्रणाली अतिश चव्हाण यांनी स्वमालकीच्या घरात शौचालय नियमित वापराबाबतचे प्रमाणपत्रगटविकास अधिकार्‍यांकडे निवडून आल्यापासून एक वर्षाच्या आत सादर करणे बंधनकारक होते. परंतु, त्यांनी तसे न करता ग्रामपंचायत अधिनिमातील कलमांचे उल्लंघन केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी परसोडी ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरलेले आहेत. सर्व सदस्य दि. २१ डिसेंबर २0१५ पासून निवडून आले होते. त्यांनी या कालावधीच्या आत खंडविकास अधिकार्‍यांना ठराव व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. या प्रकरणी पंकज सुखदेवे, व दर्शन फंदे यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले असता त्यांच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे सर्व ९ सदस्य अपात्र झालेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत परसोडीवर फेरनिवडणुकीचे संकट ओढवल्याची जिल्ह्यातील प्रथमच घटना आहे. विशेष म्हणजे पंकज सुखदेवे व दर्शन फंदे यांच्यावर काही दिवसापूर्वीच अविश्‍वास ठराव आणून सरपंच, उपसरपंच पदावर पायउतार करण्यात आले होते.