अंगणवाडी सेविका व मदनिसांचा जि.प.वर मोर्चा

0
10
गोंदिया, दि.३०  : राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे १६ जुलै २०१८ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक हे अंगणवाडी कर्मचारी विरोधी असल्याने तो रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने आज (दि.३०) अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यता आला. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे १६ जुलै २०१८ रोजी विभागाचे सहसचिव ला.रा. गुजर यांच्या स्वाक्षरीने अंब्रेला एकात्मिक बालविकास सेवा योजना या मुख्य योजनेखाली अंगणवाडी सेवा या उपाययोजनेच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याबाबत परिपत्रक काढून २५ पेक्षा कमी मुले ज्या अंगणवाडी केंद्रात आहेत, अशा अंगणवाड्या केंद्रामध्ये समाविष्ट करून अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका यांना रिक्त असलेल्या पदांवर सामावून घेणे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने शासनाचे लक्ष्य वेधण्याकरिता १६ जुलै २०१८ च्या परिपत्रकाच्या जाहीर निषेध करण्यात आला. तसेच शासनाने काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावा, अशी मागणी मोर्च्याद्वारे करण्यात आली. यासह अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी यांचे भाऊबीजचे थकीत १ हजार रुपये देण्यात यावी, ज्या प्रकल्प अधिकार्‍यांनी लापरवाही केली आहे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, सेवामुक्त अंगणवाडी सेविका, मदतनिस यांना सेवानिवृत्तीनंतर एकरकमी लाभ देण्याबाबत ३० एप्रिल २०१४ च्या शासन निर्णयावर अंमल न करणारे महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, गोंदिया जिल्हा परिषदअंतर्गत ११२ कर्मचार्‍यांना ताबडतोब लाभ देण्यात यावा, आहार भत्ता व अमृत आहारचे प्रलंबित बिल काढण्यात यावे, प्रलंबित प्रवास भत्ता देण्यात यावा, अनेक प्रकल्पांचे भत्ते कार्यालयीन चूकीमुळे देण्यात आले नाही. करिता २०१३ ते २०१८ पर्यंत चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांच्या पूर्ततेकरिता मोर्चा काढण्यात आला.
यावेळी जि.प. सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, प्रकल्प अधिकारी पवनीकर यांनी मार्गदर्शन केले. तर जि.प. सदस्य खुशबू टेंभरे, माधुरी पातोडे, सरिता कापगते प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा सचिव आम्रकला डोेंगरे, शकुंतला फटिंग, जीवनकला वैद्य, सुनिता मलगाम, पौर्णिमा चुटे, दुर्गा संतापे, वच्छला भोंगाडे, कांचन शहारे, अर्चना मेश्राम, अंजना ठाकरे, पुष्पलता भगत आदींची उपस्थिती होते. मोर्च्यात शेकडोच्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनिस उपस्थित होत्या.