सिलिंडरच्या स्फोटाने डोंगरला हादरले

0
9

तुमसर,दि,10ः- तालुक्यातील डोंगरला येथे घरघुती दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घर पूर्णत: जळून राख झाल्याची घटना रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. आगीत घरातील महत्वाचे साहित्य व दागिने तसेच ३0 हजारांची रोख रक्कम जळाल्याची माहिती आहे. या घटनेत जीवितहानी टळली.
डोंगरला ग्रामपंचायत हद्दीतील टोली क्षेत्रात फुलचंद रघुनाथ देशकर यांचे घर आहे. बैल पोळ्याच्या सणाचा दिवस म्हणून फुलचंद यांची पत्नी प्रभा देशकर पहाटे ५ ला उठली. सणाचा दिवस म्हणून घरकाम लवकर आटोपून घ्यावे म्हणून तिने स्वयंपाक खोलीत गॅस शेगडी पेटविली. चहासाठी पात्र ठेवताच अचानक आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे पाहुन प्रभा हिने पती व मुलांना सावध करत घराबाहेर धाव घेतली. कुटूंबातील सर्व सदस्य घराबाहेर येताच काही क्षणात जोरदार आवाज होऊन सिलिंडरचा स्फोट झाला.
कवेलुचे घर असल्याने सिलिंडर छताला फाडून वर हवेत फेकल्या गेला. दरम्यान स्वयंपाक घरातील जळाऊ लाकडांनाही प्रचंड आग लागली. त्यात दुसर्‍या सिलिंडरचे तापमान वाढून त्याचाही स्फोट झाला. या आगीत देशकर यांच्या घरातील सर्व साहित्य जळून राख झाले. घरातील धान्यसाठा, कपडे, बिछाने, सायकल व ईतर महत्वाचे साहित्य असे २ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.
तुमसर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. गॅस एजंसीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशी दरम्यान आग लागल्याचे नेमके कारण शेगडीच्या स्विचलगत लिकेज असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे.