‘लोकराज्य’मुळे महिलांच्या विकासाला चालना-राजेश नागपुरे

0
11

वाशिम, दि. १3 : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. विशेषतः महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आहेत. शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकामध्ये महिलांविषयक योजनांची माहिती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. यातील माहितीच्या आधारे अनेक योजनांचा महिला लाभ घेत आहेत. महिलांच्या विकासाला लोकराज्यमुळे गती मिळाली आहे, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले.

कारंजा येथे आज महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत स्थापित अल्पसंख्याक महिला लोकसंचालीत साधन केंद्राच्या कार्यालयात आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात  मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. नागपुरे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक विजय वाहने, क्षेत्रीय समन्वयक जितेंद्र कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. नागपुरे पुढे म्हणाले, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कारंजा शहरातील अल्पसंख्याक समाजातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. बचत गटाचा विकास करण्यासाठी विविध टप्पे पार पाडावे लागतात. बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. शासनाचे अनेक विभाग महिलांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. महिलांनी पुढे येवून शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे. विविध योजनांची माहिती महिलांनी लोकराज्यमधून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

श्री. खडसे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळविण्यासाठी लोकराज्य मासिक उपयुक्त आहे. त्यातील माहितीच्या आधारे आपण विविध शासकीय योजनांचा लाभ घेवू शकतो. लोकराज्य हे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी व गुजराथी भाषेत प्रकाशित होते. राज्यात असलेल्या विविध भाषिक लोकांना या मासिकातून योजनांची माहिती मिळण्यास व योजनांचा लाभ घेण्यास मदत होते. अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम बांधवांना उर्दू भाषेत लोकराज्य प्रकाशित होत असल्यामुळे त्यांना विविध योजनांची माहिती होवून लाभ घेणे सोयीचे असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून श्री. वाहने यांनी कारंजा येथे अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. कारंजा येथील अल्पसंख्याक समाजातील सर्वच महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी व त्या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी बचतगटांना व महिलांना वैयक्तिकरित्या वर्गणीदार करून घेणार असल्याचे सांगितले. यावेळी काही महिलांना उर्दू लोकराज्यचे अंक भेट म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाला अल्पसंख्याक समाजातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी सहयोगिनी वैशाली बावणे, वर्षा डाखोरे, सविता पाईकराव, सुनिता डोईफोडे, लेखापाल बेबीताई यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार विजय वाहने यांनी मानले.