न्यायमंदिर नव्हे ‘न्यायालय’ हवे

0
8

लाखांदूर,दि.16- राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या इमारतींवर कोर्ट हा इंग्रजी संविधानिक शब्दाबद्दल मराठीत लिहिलेला न्यायमंदिर हा असंविधानिक, अशासकीय व प्रमाणित नसलेला चुकीचा शब्द बदलून त्याऐवजी न्यायालय हा शब्द लिहिण्याचे निर्देश देण्यात यावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार संतोष महाले यांना बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरच्या वतिने देण्यात आले.
राज्यातील ३0 न्यायालयांपैकी ठाणे, पुणे व औरंगाबाद न्यायालय वगळता उर्वरीत २७ न्यायालयांनी काही ठिकाणच्या जिल्हा व तालुका न्यायालयांच्या इमारतींवर न्यायमंदिर व काही ठिकाणी न्यायालय शब्द लिहिले आहे. पत्रव्यवहार करताना सर्व न्यायालये कोर्ट या इंग्रजी शब्दाबद्दल न्यायालय शब्दाचाच वापर करीत असून काही इमारतींवर न्यायमंदिर तसेच न्यायालय शब्द लिहून न्यायालयांनीच विसंगती निर्माण केली आहे. त्यामुळे शब्द बदलून त्याऐवजी न्यायालय हा संविधानिक शब्द लिहिण्याचे तसेच भविष्यातही निर्माण होणार्‍या न्यायालयांच्या इमारतींवर लिहिण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी बप्रमंलाचे अध्यक्षअनिल काणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, प्रबंधक उच्च न्यायालय मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.