गोवर-रुबेला लसीकरणापासून पात्र बालक वंचित राहू नये-लक्ष्मीनारायण मिश्रा

0
6
  • २१ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात
  • जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९१७ बालकांचे होणार लसीकरण

वाशिम, दि. २३ : देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात आले आहे. आता वेळ गोवर व रुबेलाच्या उच्चाटनाची आहे. देशाची भावी पिढी असलेली बालके सदृढ रहावीत, त्यांच्यामध्ये अंधत्व, बहिरेपणा, ह्रदयविकृती, मतीमंदपणा यासारखी व्यंगत्व येऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षाच्या आतील पात्र बालके गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित राहू नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २०१८ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. मिश्रा म्हणाले, जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जे या लसीकरणासाठी पात्र लाभार्थी आहेत, त्यांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा व अंगणवाडीनिहाय तयार करावी. या व्यतिरिक्त इतरत्र असलेली बालके लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता आरोग्य व बाल कल्याण विभाग यांनी घ्यावी. लसीकरण करण्यात येणारे मार्ग, दिवस, चमू आणि ठिकाणे याचे नियोजन निश्चित करावे. पुणे येथून प्राप्त होणाऱ्या मोठ्या प्रमाणात लस ठेवण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक असलेल्या शीतपेट्या योग्य व कार्यरत आहेत का, याची खातरजमा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी करावी.

लसीकरणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरूंची कार्यशाळा घेऊन त्यांच्या माध्यमातून देखील सर्व पात्र बालकांचे लसीकरण करण्यास मदत घ्यावी. जिल्ह्यातील सर्व खासगी शाळेतील बालके या लसीकरण मोहिमेतून सुटणार नाहीत, याची देखील दक्षता घ्यावी, असे श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले.श्री. मीना म्हणाले, जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत लसीकरण मोहीम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेण्यात येईल. विशेषतः आरोग्य विभाग आणि बाल कल्याण विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यानी १०० टक्के लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले.

डॉ. आहेर म्हणाले, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत सर्व नियोजन करण्यात आले आहे. प्रचार-प्रसार व्यापक प्रमाणात करण्यात येत आहे. २१ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ लक्ष ५७ हजार ९१७ पात्र बालकांना गोवर-रुबेलाची लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम चमू, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या असून शहरी विभागातील खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची, इंग्रजी माध्यम खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची, पंचायत राज पदाधिकाऱ्यांची तसेच विविध धर्मगुरूंची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.