६१ वर्षाच्या आजीने दिला नातवाला जन्म

0
22

वृत्तसंस्था
चेन्नई, दि. ७ – चेन्नईत राहणा-या ६१ वर्षीय वृद्धेने मुलीसाठी सरोगेट मदर होण्याचा धाडसी निर्णय घेत नातवाला जन्म दिला आहे. संबंधीत वृद्ध महिला व तिच्या नातवाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
२७ वर्षीय सुमन (नाव बदललेले) तिच्या पतीसोबत चेन्नईत राहते. सुनमचे पती आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. लग्नानंतर काही महिन्यांमध्येच सुमन गर्भवती झाली. सात महिन्यांची गर्भवती असताना प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे सुमनला गर्भपात करावा लागला. गर्भपातादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांना तिचा गर्भाशय काढावा लागला. यामुळे या दाम्पत्त्याला धक्काच बसला. घरातील पाळणा कधीच हलणार नाही या भावनेने दोघेही खचले. मात्र दोन वर्षांनंतर त्यांना सरोगट मदरविषयी माहिती मिळाली. त्यांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेत सरोगसीसाठी अर्ज केला. यासाठी त्यांनी सुमारे आठ लाख रुपये खर्चही केले. मात्र त्यांचा हा प्रयत्नही अयशश्वी ठरला. अखेरीस त्यांनी चेन्नईतील ख्यातनाम रुग्णालयात सरोगेट मदरविषयी विचारणा केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी एखाद्या नातेवाईक महिलेलाच सरोगसीसाठी विचारुन बघा असा सल्ला दिला.
डॉक्टरांनी सुचवलेला पर्याय सुमनच्या आईने ऐकला व त्यांनी लगेच मुलीसाठी सरोगेट मदर होण्याची तयार दर्शवली. तिच्या आईला मासिक पाळी येणे बंद झाले होते. ती सुरु करण्यासाठी डॉक्टरांनी त्या वृद्ध महिलेवर दोन महिने हार्मोनल उपचार केले. अखेरीस अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांनी नऊ महिन्यानंतर वृद्धेने आपल्या नातवाला जन्म दिला. या चिमुरडीचे वजन २.७ किलो ऐवढे असून आता आजीची व बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.