स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक-सीमा मडावी यांचे आवाहन

0
27

गोंदिया,दि.27 : आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवायचे असेल तर आपण वैयक्तिक स्वच्छतेसोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता ठेवायला हवी, याकरिता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी केले.जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत फुलचूर येथील युवा जागृती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ फुलचूर, आंबाटोली समोर आयोजित स्वच्छता ही सेवा अभियानादरम्यान गणेश उत्सव मंडळासमोर पाणी व स्वच्छतेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रावीण्यप्राप्त स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सभापती विमल नागपुरे, माजी पं.स. सभापती स्नेहा गौतम, उपसरपंच आशा मेश्राम, ग्रामसेवक टी.बी. बिसेन, गणेश मंडळाचे अध्यक्ष गोपाल बिसेन यांच्यासह जि.प.चे राजेश उखळकर, शोभा फटींग, विशाल मेश्राम, कांचन मेश्राम आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत चालता बोलता उपक्रम, महिलांकरिता रांगोळी आणि मुलांकरिता चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांचे पाणी व स्वच्छतेबाबत प्रबोधन होत असून याकरिता गणेश उत्सव मंडळाने सहकार्य करावे, तसेच श्रमदान मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आपल्या गावातील अस्वच्छता दूर करण्याकरिता सर्वांनी सहकार्य केले तर अस्वच्छतेचा समूळ नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, याकरिता स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाणी व स्वच्छतेवर आधारित चालता बोलता कार्यक्रम, रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चालता बोलता कार्यक्रम जि.प.चे राजेश उखळकर यांनी घेतला. यावेळी आयोजित चित्रकला स्पर्धेत रिया हिरापुरे प्रथम, अंशू बनोटे द्वितीय आणि पंकट राऊत तिसरा आला. रांगोळी स्पर्धेत हर्ष मंडीया प्रथम, निलू हिरापुरे द्वितीय आणि हिरापुरे यांचा तिसरा क्रमांक आला. त्यांना जि.प. मार्फत प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय हिरापुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मनू रहांगडाले, कोषाध्यक्ष राकेश हरिणखेडे, सचिव दिवाचंद हिरापुरे, श्यामलाल पारधी, आशिष पटले, सोनू रहांगडाले, रितेश चौधरी, प्रदीप टेंभरे, छोटू पटले यांनी सहकार्य केले. .