कोहमारा ते मुंडीपार रस्त्याला बफर झोनचा फटका

0
14

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.27: केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन विभागाने जिल्ह्यातील राज्य महामार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिल्याने दळणवळणाच्या साधनांत क्रांती होणार आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मुख्यालय राष्ट्रीय महामार्गांनी वेढले जाणार आहे. परंतु नवेगाव-नागझिरा व न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे काही गावे आणि प्रमुख राज्य मार्ग बफर झोनमध्ये आल्याने स्वप्नपूर्तीत अडथडा निर्माण झाला आहे.

मध्य प्रदेशातील शहडोल-मंडला-नैनपूर-बालाघाट-रजेगाव-गोंदिया-आमगाव-देवरी-चिचगड-मसेली-कोरची-कुरखेडा-वडसा मार्गे ब्रम्हपुरी असा हा एनएच ५४३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. देवरी-आमगाव मार्गावर बांधकामाला सुरुवात झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात आमगावजवळील किडंगीपार रेल्वे चौकीपासून बाम्हणी रेल्वे चौकीपर्यंत नवीन बायपास रस्ता निर्माण होणार आहे. तर किडंगीपार रेल्वे चौकी व बाम्हणी रेल्वे चौकीवर उड्डाणपुल तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्णत: चौपदरी राहणार आहे. या चौपदरीकरणाचे काम देवरी ते किडंगीपार रेल्वे चौकीपर्यंत सुरू झाले आहे. तर दुसरा मुख्य रस्ता सावनेर-मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया-गोरेगाव-सडक-अर्जुनी-कोहमारा असा राहणार आहे. यामध्ये कोहमारा-सडक अर्जुनी-गोरेगाव-फुलचूर नाका या ४२ किलोमीटर रस्त्यापैकी १४ किलोमीटर फुलचूर नाका ते जानाटोला (घोटी) रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट पुण्याच्या जगताप कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने या रस्त्याच्या बांधकामासाठी कामाला सुरुवात केली आहे. फुलचूर नाका ते कारंजा मुख्यालय व गोरेगाव शहरातील मुख्य रस्ता हा सिमेंटचा चौपदरीकरण राहणार आहे. तर उर्वरित भाग दहा मीटर दुपदरीकरणाचा राहणार आहे. यामध्ये कोहमारा ते मुंडीपार हा २८ किलोमीटरचा रस्ता बफर झोनमध्ये असल्याने या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक मंजुरी अद्याप न मिळाल्याने जुन्याच स्थितीत राहणार आहे. तर फुलचूर नाका-मनोहर चौक-नेहरू चौक व मरारटोली हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट झाल्याने याचेही बांधकाम करण्यात येणार आहे. तर मरारटोली बायपास येथून तिरोड्याकडे जाणारा रस्ता हा मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया-बालाघाट व सिवनी या राष्ट्रीय महामार्ग ७५३ला जोडला जाणार आहे. यात काचेवानी रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र मरारटोली परिसरातील दोन्ही रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्गाने अद्याप तयार केलेला नसल्याची माहिती हाती आली आहे. सोबतच मरारटोली-जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तयार झालेल्या बायपाससोबत पुन्हा एक नवीन बायपास तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता जुन्या बायपासच्या शेजारून जिल्हाधिकारी कार्यालय चौकाला जोडला जाणार आहे. याकरिता गड्डाटोली परिसरात रेल्वे भागात पुन्हा एका नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व रस्ता बांधकामासाठी भूसंपादनाची कारवाई करण्यात आली असून संबंधित शेतकरी, जमीन मालक व दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

काय घडतेय?

– कोहमारा-मुंडीपार या २८ किलोमीटरच्या रस्त्याला बफर झोनचा फटका बसल्याने राष्ट्रीय दर्जा मिळूनही अपूर्णावस्थेत राहणार.

– राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण झाले असले तरी डोंगरगाव ते सेरपारदरम्यान दहा किलोमीटर आजही जुन्या अवस्थेत.

– वन व वन्यजीव विभागाने अंडरपासला मंजुरी दिल्यानंतरही बांधकाम न केल्याने वन्यप्राण्यांनाही प्राण गमवावे लागत आहे.