अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान पालकमंत्र्यांकडून पाहणी

0
17

गोंदिया,दि.७ : जिल्ह्यात २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी (ता.५) पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा (बुज.) येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी चर्चा करुन नुकसान भरपाईबाबत शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा दिलासा शेतकऱ्यांना दिला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोरेगाव तहसिलदार शिल्पा सोनाळे, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, नायब तहसिलदार कचरुलाल शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांनी दि.२८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करुन अहवाल तात्काळ शासनाकडे सादर करावा असे जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा (बुज.) येथील शेतकरी फत्तूलाल रहांगडाले, पालीक शरणागत, मंसाराम रहांगडाले, उत्तम बांगरे व भरतलाल रहांगडाले यांच्या शेतात जाऊन हरभरा, जवस, आलू व भाजीपाला आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.