जिल्हा वार्षिक योजना निधी खर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
10

वाशिम, दि. ०5 : जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत प्राप्त निधी व खर्च झालेल्या निधीचा यंत्रणानिहाय आढावा घेतला.

यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, सुदाम इस्कापे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी विका योजनेमधील निधी खर्चाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत. प्रस्तावित केलेल्या कामांकरिता निधी मागणीसाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करून निधी प्राप्त करून घ्यावा. ज्या बाबींसाठी अद्याप तांत्रिक मान्यता मिळालेल्या नाहीत, त्याविषयी संबंधित यंत्रणांनी आपल्या वरिष्ठ कार्यालयांकडे पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. तांत्रिक मान्यता मिळताच तातडीने प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी दिल्या.

सन २०१९-२० करिता निधी खर्चाच्या नियोजनाचे प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व यंत्रणांना कळविण्यात आले आहे. त्यानुसार सर्व यंत्रणांनी तातडीने हे प्रस्ताव सादर करावेत. या योजनेतून कामे प्रस्तावित करताना जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक कामांची प्राथमिकता लक्षात घेऊन त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी दिल्या.