आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन पत्रकारांनी विचारांची ऊर्जा निर्माण करावी – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
7

चंद्रपूर,दि.08ः- बदलत्‍या सामाजिक परिस्‍थीतीत अभ्‍यासू, निर्भीड पत्रकारितेची नितांत गरज आहे. प‍त्रकारिता ही सत्‍यावर आधारित असली पाहीजे. चंद्रपूर जिल्‍हा हा ऊर्जा देणारा जिल्‍हा आहे. त्‍यामुळे या जिल्‍हयातील पत्रकारांनी विचारांची ऊर्जा आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन निर्माण करण्‍याची आवश्‍यकता आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ ही केवळ संघटना नसुन पत्रकारांची गुणवत्‍ता वाढविण्‍याचे ते एक व्‍यासपीठ असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या कर्मवीर कन्‍नमवार सभागृहात चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्‍कार वितरण सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रमुख वक्‍ते या नात्‍याने ज्‍येष्‍ठ पत्रकार श्री. संजय आवटे, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, एखादा डॉक्‍टर चुकला तर काही काळ आरोग्‍याची समस्‍या निर्माण होईल, मात्र पत्रकार चुकला तर समाजस्‍वास्‍थ्‍य बिघडेल. त्‍यामुळे आपण जरी जग बदलवू शकत नसलो तरीही स्‍वतःमध्‍ये बदल घडवत आपल्‍यातील गुणवत्‍ता वाढविण्‍यावर भर द्यावा, असेही ते म्‍हणाले. पत्रकारबांधवांच्‍या आरोग्‍य विषयक समस्‍या, पत्रकार कल्‍याण निधीसाठी 15 कोटी रू. निधीची तरतूद अशा विविध माध्‍यमातुन शासनाने पत्रकारांच्‍या मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर जिल्‍हा मिशन शौर्य व अन्‍य सेवा उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन देशाच्‍याच नव्‍हे तर जागतीक पातळीवर आपला झेंडा फडकवत आहे. त्‍यामुळे चंद्रपूरची पत्रकारिता ही राज्‍यासाठी आदर्शवत ठरावी, अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी बोलताना व्‍यक्‍त केली.

यावेळी बोलताना ज्‍येष्‍ठ पत्रकार संजय आवटे यांनी पत्रकारीतेतील आव्‍हाने, बदलती पत्रकारिता यावर भाष्‍य केले. जेथे उजेड आहे तेथील प्रश्‍न सोडविण्‍यापेक्षा आपल्‍या लेखणीच्‍या माध्‍यमातुन अंधारवाटा प्रकाशमान करा, असे आवाहन त्‍यांनी केले. पत्रकारितेला लोकशाहीचे मोठे अधिष्‍ठान लाभले असून सर्वसामान्‍य माणसाच्‍या सक्षमीकरणाचे काम पत्रकारितेने कायम केले आहे. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाने पत्रकारांना प्रोत्‍साहीत करत त्‍यांना पुरस्‍कार देण्‍याचे जे कार्य केले आहे ते निश्‍चीतच अभिनंदनीय आहे कारण सत्‍कार ही सत्‍कार्याची संजीवनी असते, असेही श्री. संजय आवटे म्‍हणाले.

यावेळी ज्‍येष्‍ठ पत्रकार श्री. अरूण दिवाण आणि श्री. विजय बनपूरकर यांचा कर्मवीर पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍यात आला. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजित ग्रामीण वार्ता पुरस्‍कार, शुभवार्ता पुरस्‍कार आदी स्‍पर्धांच्‍या माध्‍यमातुन विजेते ठरलेल्‍या पत्रकारांचा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला. प्रास्‍ताविक अध्‍यक्ष संजय तुमराम यांनी केले. चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघाच्‍या इमारत बांधकामासाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्‍याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार त्‍यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी केले तर आभार जितेंद्र मशारकर यांनी मानले.