शहीद सुधीर पोटभरे यांना अखेरचा निरोप

0
13

भंडारा,दि.१६: :जम्मू-कटरा मार्गावर कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू पावलेल्या शहिद जवान सुधीर पोटभरे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ठाणा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव घरी आणताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. दगडालाही पाझर फुटावे, या दृश्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मुलगा सत्यम याने मुखाग्नी दिला.यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसिलदार अक्षय पोयाम, खासदार मधुकर कुकडे, आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेश शामकुवर, पंचायत समिती सदस्य राजेश मेश्राम, अमित वसानी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार सुभाष बारसे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पोलिस दलातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली.
केंद्रीय राखीव दलाच्या बटालीयन १२६ चे अधिकारी जवान समवेत कमांडो सुधीर पोटभरेसह १२ जवान १३ आॅक्टोबर रोजी कटरा-वैष्णदेवी मार्गावर कर्तव्यावर असताना अचानक सुधीर यांचा रक्तदाब वाढला. यातच त्यांची रात्री ९.३० वाजता प्राणज्योत मालविली. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव जम्मूहुन विशेष विमानाने सोमवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास आणण्यात आले. यावेळी जवान राधेश्याम महादेव पटले हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरहून नागपूर केंद्रीय राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर हिवरकर यांच्या पथकाने शहिद सुधीर यांचे पार्थिव वाहनाने परसोडी येथे आणले. पोटभरे यांच्या अंत्य दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून परसोडी गावातून काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा राहुन शहिद सुधीर यांना आदरांजली वाहिली. ठाणा मोक्षधाम येथे केंद्रीय राखीव दलाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर हिवरकर, एम.डी. हरूण, प्रकाश सोलंके, संतोष तेलंगे, पीमप्लेश रमेश, अविनाश पाटील, सुहास पाटील, संजय इंगळे, प्रशांत वासनिक, भैरम प्रदीप, सुनिल मुंजल, वेणू एम, जितेंद्र यादव व भंडारा पोलीस विभागाच्या वतीने सलामी देण्यात आली. यात राजहंस वाडीभस्मे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दुरगकर, सरपंच सुषमा पवार, पंकज सुखदेवे, मोतीलाल येळणे, रज्जाक शेख, दौलत वंजारी, अशोक बालपांडे, सभापती अनिल निर्वाण, प्रभू हटवार, डॉ. दिलीप फटींग, प्रा. सुभाष वाडीभस्मे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन किरपान उपस्थित होते.