टाकीवर चढून पानठेलाधारकांची वीरूगिरी

0
7

गडचिरोली,दि.28ःः शहरातील पानठेलाधारकांवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या कठोर कारवाईचा निषेध करण्यासाठी जवळपास २५ पानठेलेधारकांनी आरमोरी मार्गावरील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनाविरोधात निदर्शने केली. पानठेलेधारक टाकीवरच चढून असल्याने त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. आधी रोजगार उपलब्ध करून द्या, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करा अशी त्यांची मागणी होती.
आठ दिवसांपूर्वी नगर परिषदेने इंदिरा गांधी चौकातील पानठेलेधारकांना नोटीस बजावली होती. या चौकातच महिला रुग्णालय आहे. महिला रुग्णालयापासून १०० मीटर अंतरावर असलेले पानठेले हटविण्यात यावे, असे नोटीसमध्ये म्हटले होते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर पानठेलाधारकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारले. मात्र प्रशासन कारवाई करण्यावर ठाम आहे.
पानठेलाधारकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, त्यानंतरच पानठेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ओबीसी संघटनेचे रूचित वांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील जवळपास २५ पानठेलेधारक शनिवारी दुपारी ३ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले. पाण्याची टाकी गांधी चौकातच असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. ४ वाजताच्या सुमारास पोलीस पोहोचले. त्यानंतर एसडीओ डॉ.सचिन ओंबासे, एसडीपीओ विशाल ढुमे, ठाणेदार दीपरत्न गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी घटनास्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. पानठेल्यांवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.