शेतातील धान कापणीचे शेतकरी नावच घेईना

0
28

साकोली ,दि.२९ः: पावसाने दगा दिल्याने उद्ध्वस्त झालेला शेतातील धान कापणीची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे. मजुरी अंगावर बसण्याच्या भीतीने शेतकरी कापणीचे नावच घेत नाही. जिल्हाभरात शेकडो हेक्टरवर धान कापणीच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने मध्यम दुष्काळ घोषित करताना भंडारा जिल्ह्यात दुजाभाव केल्याने यंदा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहे.
भंडारा जिल्ह्यात गत तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाअभावी धान शेती नेस्तनाबूत होत आहे. मात्र दरवर्षी त्याच उमेदीने शेतकरी शेतात रोवणी करतात. यंदाही सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रोवणी केली. मध्यंतरी समाधानकारक पाऊसही झाला. पंरतु आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली ती कायमची. वार्षिक सरासरीच्या ७६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे धानपिक शेतातच वाळून गेले. ९० टक्के सिंचनाचा दावा करणाऱ्या प्रशासनाने प्रकल्पाचे पाणी योग्यवेळी धानासाठी सोडले नाही. परिणामी जिल्ह्याभरातील शेकडो हेक्टरवरील धान शेतातच वाळला. शेतात जावून बघीतल्यास धानाच्या लोंब्या भरल्या नसल्याचे दिसून येते. हाती काहीच पीक येणार नाही, मजूरी अंगावर बसेल अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्यामुळे साकोली तालुक्यासह जिल्ह्याभरातील शेतात धानाचे पीक उभे आहे. निम्न प्रतीचा धान काढण्याची ही वेळ आहे. परंतु बहुतांश शेतकरी पिकाची अवस्था पाहून धान काढण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.
आधीच कर्जाचा डोंगर त्यात मजूरीचेही पैसे अंगावर कशाला बसून घ्यायचे असा सवाल थेट शेतकरी करीत आहे. धान कापूनही घरी काय तणस न्यायचे काय? असे शेतकरी म्हणत आहे. एकंदरीत यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे गडद सावट आहे. मात्र शासनाने मध्यम दुष्काळ घोषीत करताना केवळ तीन तालुक्यांचा समावेश केला. त्यामुळे शेतकऱ्यात रोष व्यक्त होत आहे. शासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.