रेतीघाटाहून चार ट्रक, जेसीबी जप्त

0
20

मोहाडी ,दि.२९ः: तालुक्यातील रेती घाटांवर मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची खुलेआम वाहूतक होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच जिल्हा भरारी पथकाने प्रत्येक रेतीघाटावर निगराणी सुरु केली आहे. बोथली पांजरा रेती घाटावरून चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात भरारी पथकाला यश आले. अस असले तरी रेती तस्करावर याचा कोणताच परिणाम झाल्याचे निदर्शनास येत नसून पुन्हा जोमात रेतीची चोरी सुरुच आहे.मोहाडी तालुक्यातील बोथली, पांजरा, पाचगाव, नेरी, मुंढरी बुज, मोहगाव देवी, रोहणा, रोहा, बेटाळा तर, तुमसर तालुक्यातील परंतु मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोरवाडा या रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरुच आहे.
मोहाडी तालुक्यातील पांजरा (बोथली) येथील सूर नदीतून रेती काढून जवळच डंपींग केली जाते. नंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रक, टिप्पर भरून ती रेती नागपुरकडे पाठविली जाते. मोहाडी तालुक्यातून नागपूर पर्यंत रेती नेण्यासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा उपयोग केला जातो.
रेती घाटावरून राज्य मार्गावर येण्यापर्यंतच त्यांच्याकडे रॉयल्टी नसते. राज्य मार्गावर येताच रॉयल्टीसह रेतीचा पुढील प्रवास सुरु होतो. विशेष म्हणजे दहा दिवसापूर्वी रोहणा येथे घडलेल्या रेतीच्या ट्रकच्या अपघातात मध्यप्रदेशातील रॉयल्टी जप्त करण्यात आली आहे.
२३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा भरारी पथकाने पांजरा (बोथली) घाटावर रेती भरण्यासाठी आलेले ट्रक मालक प्रवीण रामचंद्र समरीत डोंगरगाव यांचे ट्रक क्रमांक एमएच ३५ एफ ४४६१, चार ब्रास रेतीसह, एमएच ३६ एए ४४६१, जेसीबी क्रमांक एमएच ३६ झेड ४४६१, ट्रक मालक गोविंद देशकर भंडारा यांचा ट्रक क्रमांक एम.एच. ३५ एफ ५६३२, चार ब्रास रेतीसह असे चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात येवून मोहाडी पोलीस ठाण्यात जमा करून ठेवण्यात आले आहे.
शासनाच्या नियमानुसार चोरीच्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर एक लक्ष २० हजार रुपये तर, ट्रकवर २ लक्ष २५ हजारांचा दंड ठोठावला जातो. एवढा मोठा दंड आकारुनही रेतीची सर्रास चोरी केली जाते. यावरूनच रेतीच्या व्यवसायात अफाट नफा मिळत असल्याचे सांगण्यात येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.