जुन्या योजनांचे नाव बदलून प्रसिध्दी लाटणारी सरकार-आ.अग्रवाल

0
15

गोंदिया,दि.05: काॅंग्रेस शासनकाळातील राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून भाजप सरकारने महात्मा जोतीबा फुले करून दिले. मात्र जोपर्यंत आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स व अत्याधुनिक सुविधा राहणार नाही, तेव्हा भाषणबाजी कामी येणार नाही. जिल्ह्यातील जनतेला येथेच सर्व सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही शासकीय मेडीकल कॉलेजची स्थापन करविली.यातून रोजगाराच्या संधी वाढणार असून जिल्ह्यातील रूग्णालयांत आवश्यक नर्सेसची उपलब्धता वाढणार आहे. फक्त योजनांचे नाव बदलून कुणाचेही भले होणार नसल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयातील नवनिर्मित अति दक्षता कक्षाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी यांनी, रूग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद पडून होती. तेव्हा कुणी पुढे आली नाही. मात्र आमदार अग्रवाल यांनी नवीन मशीनसाठी तीन कोटी रूपये मंजूर करवून आणले. जिल्हास्तरीय जनप्रतिनिधी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून प्रचार करतात. मात्र जबाबदारी स्वीकारून जनतेला सुविधा देण्यासाठी फक्त आमदार अग्रवाल पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले.
१०९ लाखांच्या निधीतून निर्मित या वास्तूचे लोकार्पण पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. तर १४१ लाखांच्या शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे भूमिपूजनही याप्रसंगी करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.रुखमोडे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले,महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, व्यंकट पाथरू, सुशिल रहांगडाले, विनोद ठवकर, खलील पठाण, राकेश ठाकुर, संदीप ठाकुर, सुनील भालेराव, क्रांती जायस्वाल, श्रीचंद पाथोडे, मंटू पुरोहीत, मजूर संघाचे अध्यक्ष बंटी मिश्रा यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.