सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली पारदर्शकता

0
8
  • ७७५ स्वस्त धान्य दुकानांतून ई-पॉसद्वारे वितरण
  • १००० अपात्र शिधापत्रिका रद्द
  • ५ लक्ष ७६ हजार लिटर केरोसीनची बचत
  • केरोसीन, धान्य घेतल्यानंतर रोख पावती घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. १५ : सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरणामुळे जिल्ह्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य व केरोसीन वितरीत करण्यात येत असल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आली आहे. त्यामुळे पात्र व गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे केरोसीन व धान्य मिळण्यास मदत झाली आहे. तसेच धान्य, केरोसीनच्या अवैध वाटपास आळा बसला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, निरीक्षण अधिकारी निलेश राठोड आदी उपस्थित होते.

श्री. वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात सर्व ७७५ स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनद्वारे वितरण सुरु झाले आहे. याकरिता शिधापत्रिका व आधारकार्ड लिंकिंग करण्यात आल्याने बोगस शिधापत्रिका शोधण्याच्या कामाला गती मिळाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १००० शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असून रद्द केलेल्या शिधापत्रिकाधारकांऐवजी पात्र लाभार्थ्यांचा समावेश त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण होत असल्याने अवैध धान्य वाटपास आळा बसला आहे. जिल्ह्यातील सर्व योजनांचे गहू व तांदूळ याचे मासिक नियतन ६३५५ मे. टन एवढे असून ई-पॉस मशीनमुळे ऑक्टोंबर २०१८ अखेरपर्यंत अन्नसुरक्षा योजनेतील ३३३ मे. टन धान्य तर शेतकरी लाभार्थी कुटुंबातील १२०० मे. टन धान्याची अशी एकूण १५३३ मे. टन धान्याची बचत झाली आहे.

जिल्ह्यात गॅस स्टँपिंग मोहीम प्राधान्याने राबविण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांकडे गॅस जोडणी आहे, त्यांचा केरोसीन कोटा बंद करण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान गॅस जोडणी उपलब्ध असूनही चुकीचे हमीपत्र सादर करणाऱ्या लाभार्थ्यांविरुध्द कार्यवाही करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आल्यामुळे जिल्ह्यात केरोसीनची बचत होत आहे. जानेवारी २०१८ मध्ये जिल्ह्याला शासनाकडून ६ लक्ष ४८ हजार लिटर केरोसीनचे नियतन मंजूर झालेले आहे. ते आज ७२ हजार लिटर एवढे आहे. म्हणजेच आज जिल्ह्याच्या नियतनात ५ लक्ष ७६ हजार लिटरची बचत झाली असल्याचे श्री. वानखेडे यांनी सांगितले.

धान्य वितरणातील अनियमितता व इतर वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यातील ८ रास्तभाव दुकाने रद्द करण्यात आली आहेत. तसेच अन्न दिनादिवशी बंद असलेल्या एकूण ११३ रास्तभाव दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३ किरकोळ केरोसीन परवाने रद्द करण्यात आले आहेत, तसेच ५ किरकोळ केरोसीन परवान्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असल्याचे सांगून श्री. वानखेडे म्हणाले की, सर्व शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानातून अन्नधान्य व केरोसीन घेत असताना दुकानदाराकडे रोख पावतीचा आग्रह धरावा. रोखपावती घेतल्याशिवाय अन्नधान्य अथवा केरोसीन घेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.