वाचन संस्कृती विकसनाचे मोठे काम दिवाळी अंकांनी केलेले आहे:डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे

0
12

भंडारा,दि.19ः- ग्रंथ वाचनाची मोठी दीर्घ परंपरा महाराष्ट्राला आहे.मध्यंतरी ही परंपरा जराशी क्षीण होताना आपल्याला दिसते.समाज माध्यमाने तर या परंपरेवर मोठे आक्रमणच केलेले आहे.तरीही वाचन संस्कृती टिकविण्याचे व तिच्या विकसनाचे महत्वाचे काम प्रकाश पर्वावर मोठ्या प्रमाणात प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांनी केलेले आहे; असे उद्गार  संत साहित्याचे अभ्यासक डॉ.गुरुप्रसाद पाखमोडे यांनी दिवाळी अंक प्रदर्शनीचे उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना काढले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ,भंडारा च्या विद्यमाने दिवाळी अंकाच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते.या दिवाळी अंक प्रदर्शनीचे उदघाटन सुप्रसिद्ध कवी , नाटककार डॉ.सुरेश
खोब्रागडे  यांनी केले.प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड व सुप्रसिद्ध कवी प्रमोदकुमार अणेराव यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांनी केले.या प्रसंगी अमृत बन्सोड व प्रमोदकुमार अणेराव यांनी वाचन संस्कृतीच्या लयास जाण्याविषयी चिंता व्यक्त करीत ,वाचन संस्कृतीच्या विकसना साठी काय काय करता येईल याविषयी समयोचित भाषण केले.या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे कर्मचारी श्री.नारनवरे यांनी केले.आभार प्रदर्शन सौ.कांबळे यांनी केले.या कार्यक्रमाला प्रसिध्द आंबेडकरी विचारवंत प्राचार्य भगवान सुखदेवें आणि अनेक श्रोते, अभ्यासक उपस्थित होते.वाचकांच्या सोयीसाठी हे प्रदर्शन एक सप्ताह चालणार आहे.