…अखेर साकोली, अर्जुनी मोरगाव, कुरखेडा बस झाली सुरू

0
49

अर्जुनी मोरगाव दि.२२ः: गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. मात्र, स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही अनेक मार्गावर बसफेऱ्या नसल्याने आवागमनाची मोठी समस्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वदूर पहावयास मिळत आहे. कर्तव्यदक्ष म्हणून नावाजलेले पं.स. सभापती अरविंद शिवणकर यांनी साकोली आगार व्यवस्थापक यांच्याकडे साकोली, बोंडगावदेवी, अर्जुनी मोरगाव, खैरी, कालीमाती, गोठणगाव, केशोरी, राजोली, कुरखेडा या मार्गावर दोन बसफेऱ्यांची मागणी केली होती. अखेर साकोलीचे आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी या मार्गावर बसफेरी सुरू केल्याने या गावातील प्रवासी आनंद व्यक्त करीत आहेत. .

साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार साकोली येथून सकाळी ७.३० वाजता बस निघेल ती बोंेडगावमार्गे अर्जुनी मोरगाव येथे ८.३० वाजता पोहोचेल तर केशोरी येथे ९ वाजता पोहोचेल. कुरखेडा येथे १०.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या वेळी कुरखेड्यावरून ही बस १०.४५ वाजता निघून केशोरी येथे ११.४५ वाजता पोहचेल तर अर्जुनी मोरगाव येथे १२.१० वाजता, साकोली येथे १३.१० वाजता पोहचेल. पुन्हा साकोली येथून १.३० वाजता ही बस निघून अर्जुनी मोरगाव येथे २.३०, केशोरी येथे ३.१५, कुरखेडा येथे ४.३० वाजता पोहोचेल. ४.४५ वाजता कुरखेडा येथून ही बस अर्जुनी मोरगाव येथे ६.३० वाजता तर साकोली येथे ७.३० वाजता पोहोचेल. अशाप्रकारे दिवसभर २ फेऱ्या ही बस करणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांनी दिली. नक्षलग्रस्त, आदिवासी अशी अर्जुनी मोरगाव तालुक्याची ओळख असून खैरी, सुकडी, गोठणगाव, राजोली, केशोरी या गावात बसची सोय झाल्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, आगार व्यवस्थापक  यांच्यावर जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..