माओवाद्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही :स्मिता गायकवाड

0
9

नागपूर,दि.२२ः: आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.
आर.एस.मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.उल्हास औरंगाबादकर, प्राचार्य संध्या नायर प्रामुख्याने उपस्थित होते. माओवाद्यांना विकास किंवा आदिवासींचे भले नको आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता हवी आहे. माओवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांत आदिवासींना कधीच नेतृत्व मिळाले नाही. त्यांच्या हाती केवळ बंदुकाच देण्यात आल्या. ज्या प्रमाणे माओवादी देशातील सुरक्षारक्षक व आदिवासींना जीवे मारतात, त्यातून त्यांचा विकृतपणा दिसून येतो. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असे कॅ.गायकवाड म्हणाल्या.
‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.