ड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा झाले पाहिजे- – मुख्यमंत्री

0
6

नागपूर, दि.24 : भारत व जपान या दोन देशातील मैत्रीचा धागा दृढ करण्याचे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने होत आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे नागपूर जगाच्या नकाशावर येत आहे. ड्रॅगन पॅलेस हे स्थळ जागतिक वारसा झाले पाहिजे. राज्य शासन हा वारसा जपण्याचे काम करेल असे आश्वस्त उद् गार मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज काढले.
कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात आयोजित ड्रॅगन पॅलेसच्या एकोणविसाव्या वर्धापनदिनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड सुलेखाताई कुंभारे, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय निचीरेन –शु फेलोशीप असोशीएशन चिबा जपान येथील प्रमुख भदन्त कानसेन मोचीदा यासह जपान येथील भिक्षुगण उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढील हजार वर्ष टिकणारे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे. दरवर्षी जगभरातुन लाखो लेाक इथे भेट देतात. चीन, जपान, कोरीया, साउथ इस्ट एशिया या देशात भगवान बुद्धाचा विचार पोहोचला व रूजला. त्यामुळे भारताबद्दल या देशामध्ये आत्मीयता आहे. जगभरातुन आलेल्या लोकांमध्ये बुद्धाच्या भुमीवर आलो ही बाब त्यांना समाधान देते.
माणसाला माणुस म्हणुन जगण्याचा सोपा मार्ग भगवान बुध्दांनी दाखवला असे मुख्यमंत्री म्हणाले. ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातुन बोधीसत्वाचा,पंचशीलाचा संदेश पोहचविला जातो. यावेळी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ड्रॅगन पॅलेससाठी केलेल्या सहकार्याचा ही विशेष उल्लेख केला.
यावेळी विपश्यना सेंटर येथील 80 किलोवॅट क्षमतेच्या पारेषण संलग्न सोलर रुफटॉप व अन्य विकासकामाचे भुमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.