संविधानाला छेद हा देशाचा अपमान : चंद्रिकापुरे

0
11

सडक अर्जुनी,दि.28 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला बहाल करताना संविधान सभेत पूर्वसंध्येला जो गर्भित इशारा दिला होता त्याचे भान आजच्या राज्यकर्त्यांना न राहिल्यामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जडण-घडण होण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. धर्मांध शक्तीची धर्मनिरपेक्षतेवर कुरघोडी करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे सुरू झाले आहे. त्यामुळे शोषित पीडित वर्गाला जीवन जगणे अशक्य झालेले आहे. आरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. उच्च शिक्षणाकरिता संविधानात ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्यांची पदोपदी पायमल्ली करण्यात येते. कुठल्याही सामाजिक घटकाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत नाही, परंतु सर्व शिक्षण क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करणे सुरू असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले. .

ते पांढरी येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात संविधान दिवस कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर चंद्रिकापुरे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.ज्ञानेश्वर वाकुडकर, सावन कटरे, नरेंद्र मेश्राम, डि.यु. रहांगडाले, प्रतिभा मेश्राम, प्रमिला पटले, नरेश भेंडारकर, विजय बिसेन, डि.बी.वडीले, गजानन परशुरामकर आदी मान्यवर उपस्थित होते.चंद्रिकापुरे पुढे म्हणाले, राज्यांनी जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत: अनु.जा., अनु.ज. यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील असेही अभिप्रेत आहे. पण या सर्व गोष्टींकडे राज्यकर्ते अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत असे ते म्हणाले. वाकुडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देश फोटो लावून जय जयकार करून चालणार नाही तर देशात असलेली वाईट प्रवृत्ती दूर करवी लागेल, आपण ८५% ओबीसी, एससी, एसटी, बहुजन बांधव एकत्र येत नाही म्हणून १५% लोक आपल्यावर राज्य करत आहेत. लोकप्रतिनिधी निवडून देताना आपण चांगल्या व्यक्तीला निवडून दिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी सावन कटरे, नरेंद्र मेश्राम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक एच. बी.चव्हाण सर यांनी केले. संचालन सेवक मते यांनी केले तर आभार कटरे यांनी मानले..