पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्र सदस्याविना

0
6

लाखनी,दि.0७ : लोकप्रतिनिधित्व अधिनियमान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे पद काही अपरिहार्य कारणामुळे रिक्त झाले असल्यास ६ महिन्यात निवडणूक घेऊन भरण्यात यावे असा नियम आहे, पण पालांदूर जि.प.क्षेत्र ७ महिन्यापासून जि.प.सदस्याविनाच असल्याने विकासकामे ठप्प पडली आहेत. लवकरात लवकर निवडणूक घेऊन पद भरण्यात यावे अशी मागणी होत आहे. .

भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ गटापैकी लाखनी तालुक्यात मुरमाडी/सावरी, लाखनी, केसलवाडा/वाघ, पोहरा, मुरमाडी/तुप.आणि पालांदूर/चौरास असे ६ जि.प.क्षेत्र आहेत. पालांदूर क्षेत्राच्या दिवंगत जिल्हा परिषद सदस्या वर्षा रामटेके यांचे अपघाती निधन झाल्याने मागील ७ ते ८ महिन्यांपासून जागा रिक्त आहे. लहान सहान बाबीवरुन शासन प्रशासनास धारेवर धरणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वपूर्ण विषयावर मौन बाळगून असल्याने जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. जि.प.सदस्याचे पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनापासून वंचित राहण्याची वेळ आली असून विकास कामांचा पाठपुरावा किंवा नियोजनातच समाविष्ट केली जात नसल्याने विकासकामे ठप्प पडली आहेत. मागास क्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या पालांदूर परिसर या प्रकारामुळे पुन्हा इतर क्षेत्रांच्या तुलनेत मागे पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकशाही शासन प्रणालीत एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास किंवा निधनामुळे जागा रिक्त झाल्यास ६ महिन्यात पोट निवडणूक घेणे आवश्यक असताना निवडणूक विभाग याकडे दुर्लक्ष का करतो हे समजण्यास मार्ग नाही. असाच प्रकार पवनी तालुक्यातील ब्रम्ही जि.प.क्षेत्राचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या निधनामुळे असाच प्रकार याही क्षेत्रात आहे. निवडणूक विभागाने पालांदूर व ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी त्या त्या क्षेत्रातील जनतेकडून मागणी होत आहे..