राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटच्या गावापर्यंत बळकट करा-दिलीप बन्सोड

0
12

अर्जुनी मोरगाव दि. १3 : : राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी व ध्येय धोरण अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटच्या गावातील घटकापर्यंत पोहोचवावे व राष्ट्रवादी पक्षाच्या बळकटीसाठी तालुकास्तर व बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी नव्या दमाने कामाला लागावे. तालुक्यातील १४० बुथवर बुथ अध्यक्षांची निवड व प्रत्येक बुथवर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष प्रतिनिधी बुथ लेवर एजंट ३० डिसेंबरपर्यंत नियुक्त करावे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील गरजवंतांना त्यांच्या तालुकास्तरावरील अडचणी विचारून त्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे व पक्ष मजबूत करावे, असे आवाहन तिरोडा येथील माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते दिलीप बन्सोड यांनी केले.

नगरपंचायत अर्जुनी मोरगावच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ कमिटी सभेला ते संबोधित करीत होते. सभेला राष्ट्रवादीचे अर्जुनी मोरगाव विधानसभा प्रमुख लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, नारायण भेंडारकर, नामदेव डोंगरवार, राकाँ महिला आघाडी तालुका अध्यक्ष शिशुकला हलमारे, आर.के. जांभुळकर, मनोहर शहारे, चित्रलेखा मिश्रा, रतिराम राणे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे यांनी पक्षाची तालुक्यातील वाढती स्थिती व पुढे होणारी वाटचाल व मार्गदर्शक सूचना सभेत मांडल्या. विधानसभा प्रमुख लक्ष्मणराव चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा लेखाजोखा सादर करून सामान्य कार्यकर्ता कसा असावा, हे सांगून पक्ष बळकटीसाठी काही सूचना केल्या. किशोर तरोणे यांनी अनुभवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात युवक-युवतींचा कल राष्ट्रवादीकडे कसा आणायचा यावर मार्गदर्शन केले. .

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्या अभ्यासू मार्गदर्शनात आज गावागावात राष्ट्रवादीचे जाळे मजबूत झाले आहे. संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात रात्रंदिवस जाऊन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे दिसत आहे. मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्यासोबत तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, जि.प. सदस्य किशोर तरोणे व त्यांचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या वाढीसाठी कोणतीच कसर बाकी ठेवली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे हात मजबूत होऊन पुढील वाटचाल सुकर होईल, असा आत्मविश्वास सभेत व्यक्त करण्यात आला.