लहान मुलांना वाहन चालविण्यास बंदी;पालकांवर होणार कारवाई

0
41

गोंदिया,दि.20ःःजिल्ह्यात हेल्मेटसक्ती झाल्यानंतर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपघातांमध्ये घट व्हावी, यासाठी बुधवार, १९ डिसेंबरपासून १८ वर्षाखालील लहान मुलांनाही वाहन चालविण्यास बंदी करण्यात आली आहे. तर मोटार वाहन कायद्यान्वये वाहन चालविणारे लहान मुले व त्यांना वाहन देणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पहिल्याच दिवशी चार पालक व त्यांच्या पाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
राज्यात बाल न्याय कायद्यान्वये राज्यातील बाल न्याय यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. वाहतूक अपघातांच्या व गुन्ह्यांच्या समितीद्वारे अभ्यास केला असता, लहान मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लहान मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातांतील वाढ ही गंभीर बाब असून, समाजाचे स्वास्थ बिघडवणारी आहे. अशा प्रकारच्या अपघातांना प्रतिबंध करणे व समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी १८ वषार्पेक्षा कमी वयाच्या मुलाद्वारे वाहन चालविण्यात येऊ
नये, यासाठी गोंदिया पोलिस व मोटार परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे विशेष जनजागृती मोहीम १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जे. एम. हायस्कूल गणेशनगर गोंदिया, साकेत पब्लिक स्कूल गोंदिया, एस. एस. कॉलेज गोंदिया, किरसान इंटरनॅशनल स्कूल गोंदिया, श्रीराम विद्यालय चिचगड, कला व विज्ञान विद्यालय चिचगड, शिव आदिवासी विद्यालय डव्वा या ठिकाणी वाहतूक शाखेच्यावतीने रस्ता अपघात, वाहतूक नियम तसेच लहान मुलांनी वाहन चालवू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून १९ डिसेंबरपासून गोंदिया शहरात व जिल्ह्यात वाहन चालविणारे लहान मुले व त्यास वाहन देणार्‍यांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. लहान मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातांतील वाढ ही गंभीर बाब असून, अशा प्रकारच्या अपघातांना प्रतिबंध करणे व समाजात जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात लहान मुलांना वाहन चालविण्यास बंदी घातलण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी वाहन परवाना प्राप्त झाल्याशिवाय आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांनी केले आहे.