नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा पाचवा स्थापना दिन साजरा 

0
16
साकोली,दि.20:नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा पाचव्या स्थापना दिन मनोहरभाई पटेल आर्ट,कॉमर्स, सायन्स महाविद्यालय साकोली येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक़्रमात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी तसेच मानव वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे, राजकुमार जोब, प्रा.एल.पी. नागपुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वससंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम हे होते. सहायक वनसंरक्षक आर.आर.सदगीर यांनी कार्यक्रमाची प्रास्तावना सादर केली.
डोंगरगाव वनपरिक्षेत्रातील वनरक्षक यांनी मुकनाट्याच्या माध्यमातून पाण्याच्या काळजीपूर्वक वापराबाबतचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे विशेष व्याघ्र संरक्षण दलातील जवानांनी झाडे लावा, पर्यावरण वाचना हे संदेश देत झाडांची होणारी तोड व त्याचे नुकसान याबद्दलचे सादरीकरण केले. कोका वन्यजीव अभयारण्याचे वनरक्षक एस.आर. अंबुले यांनी ‘यम है हम या एकांकीकेच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन, तसेच तंबाखू, पान बीडी व्यसनमुक्तीबाबत महत्व पटवून दिले. नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्रामध्ये मागील पाच वर्षाच्या कामांबाबत तसेच या विभागात मार्फत विविध कामाबाबत पी.ए.पाटील यांनी सादरीकण केले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनक्रिडा स्पर्धा २०१८ मध्ये विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पदके देण्यात आले. टाईगर हाऊस, बीअर हाऊस, लियोपार्ड हाऊस, गेओर हाऊस असे एकूण ४ गट तयार करुन सर्वाधिक गुण प्राप्त करण्यात आलेल्या टाईगर हाऊसला उत्कृष्ट गट घोषित करुन ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील विविध कामामध्ये सहकार्य केल्याबाबत पोलीस निरीक्षक किशोर पर्वते,जितेंद्र बोरकर, कनिष्ठ अभियंता आर.एम.मडावी, सुखदेव शहारे, विनोदकुमार डहाट, किशोर सरगर, देवदास समरीत, अमोल अशोक गवळी, आर.यु. मानकर, सुनील खांडेकर, यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
मुकुंद धुर्वे, राजकमल जोब यांनी आपल्या भाषणामध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्व स्वयंसेवी संस्था या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संवर्धनामध्ये कशी भागीदारी करत आहेत. याबाबत तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचे संवर्धनाबाबत भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
वनसंरक्षक आर.एम. रामानुजम यांनी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थाद्वारे चालू असलेल्या कामाबाबत आपले विचार मांडले. तसेच केलेल्या सहकार्याबद्दल समाधान केले. वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धन व त्यांच्या संख्येत वाढीबाबत तसेच येत्या २०२० पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राला भारतातील मुख्य ५ व्याघ्र प्रकल्पाच्या नावामध्ये समाविष्ट कसे करता येईल. यासंबंधी मार्गदर्शन केले. आभार वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एच. डिगोळे यांनी मानले.