सरपंच/उपसरपंच ग्रामविकासाचे केंद्रस्थान-सभापती सौ.डोंगरवार

0
19

साकोली,दि.21ः-स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी तथा पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली तालुक्यातील सरपंच/उपसरपंच यांची तालुकास्तरीय कार्यशाळा स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी साकोलीच्या सभागृहात पार पडली.कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यामूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटक पंचायत समितीच्या सभापती उषा डोंगरवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य होमराज पाटील कापगते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक पाहुणे म्हणून जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे,  नगराध्यक्ष धनवंताताई राऊत, पंचायत समिती उपसभापती वर्षाताई कापगते,लखन बर्वे,नगरपरिषद उपाध्यक्ष तरुण मल्लानी,चेतन भैरम,पंचायत समिती साकोलीचे श्री टेंभरे,श्री. झलके,श्री.मेंढे व तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री.वाडबुद्धे उपस्थित होते.

उदघाटनप्रसंगी बोलताना सभापती सौ.उषा डोंगरवार यांनी एकच ध्यास ग्रामीण विकास या ब्रिदवाक्यानुसार काम करत राहिल्यास आदर्श ग्राम निर्मिती सहज शक्य असल्याचे प्रतिपादन केले. सरपंच हा गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे कार्यशाळेच्या माध्यमातून आपले अधिकार,कर्तव्ये याची जाणीव करून घेऊन गावाचा विकास करावा असे  होमराज पाटील कापगते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.ग्रामविकासाचा खरा शिल्पकार सरपंच हाच असून त्यांचे अधिकार,कर्तव्य,जबाबदाऱ्या व नियम याबाबत सखोल माहिती मिळावी या हेतूने सदरील कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे संस्थेची भूमिका असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रकाश बाळबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.संस्थेच्या उपक्रमाबद्दल विविध वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.कार्यशाळेला सरपंच/उपसरपंच यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍड. दिलीप कातोरे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष ऍड. अण्णा परशुरामकर यांनी मानले.