प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरिता काहीही गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही- आ.विजय रहांगडाले

0
12

गोंदिया  दि. २२ : : महिला आर्थिक विकास महामंडळ बचतगटाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरीता आता महिलांना काहीही गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने आज गोरेगाव पंचायत समितीच्या प्रांगणात तेजस्विनी लोकसंचालीत साधन केंद्र गोरेगाव मार्फत आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
श्री.रहांगडाले पुढे म्हणाले, महिला कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. विधानसभेमध्ये नुकत्याच पारीत झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीकडून महिलांचा आर्थिक विकास व्हावा याकरीता कापडी पिशवी शिलाईचे काम बचतगटाच्या महिलांना मिळेल यासाठी जिल्हा नियोजन समिती गोंदिया यांच्याकडून माविमला निधी प्राप्त करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्री.बारेवार म्हणाले, गोरेगाव शहरी भागाकरिता नवीन भारतीय स्टेट बँकची शाखा उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया झालेली असून, लवकरच ती आपल्यासाठी सुरु करण्यात येईल, ज्यामुळे कर्ज उपलब्ध होण्यास सोईचे होईल तसेच महिलांना आर्थिक व्यवहार करण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
श्री.पहिरे म्हणाले, महिलांच्या विकासात बँकेचे सहकार्य मोठ्या प्रामाणात लाभत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बँकेचे शाखा प्रबंधक निश्चितच आपल्याला समुपदेशन करुन सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत. गोरेगाव तालुक्यात ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन शाखा आहेत. सोबतच अटल पेन्शन योजना, सुकन्या योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री विमा योजना आदी योजनांचा लाभ घेण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
श्री.देशमुख यांनी गुरांच्या आरोग्य विषयक माहिती दिली तसेच वैरण कसे तयार करावे, गायीचे व म्हशीचे तसेच बकरीचे दुधात कशी वाढ करून आणता येईल याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. श्री.जागरे यांनी नाबार्डच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत बचतगटांच्या १३ माहिलांना ६.५० लाख रुपयाचे कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या वतीने तीन महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले त्यामध्ये लक्ष्मी व एकता महिला बचत गट सर्वात जास्त कर्ज घेणारे (रुपये- पाच लाख ) गट ठरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत ५ महिलांना गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले व स्तुती महिला बचत गटाला समाज कल्याण विभागाच्या वतीने मिनी ट्रॅक्टर वितरीत करण्यात आला.
कार्यक्रमास गोरेगाव नगराध्यक्ष आशिष बारेवार, पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे, उपसभापती लीना बोपचे, मुद्रा बँक समन्वय समिती सदस्य नंदकिशोर साखरे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, गटविकास अधिकारी रोहिणी बनकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, आर्थिक साक्षरता गोंदिया केंद्र प्रमुख आर.के.पहिरे, कृषी विज्ञान केंद्र हिवरा कार्यक्रम समन्वयक एन.एस.देशमुख, आय.सी.आय.सी.आय.बँकेचे अमोल राजगिरे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थिती होते.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बचतीतून समृद्धीकडेङ्क पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
प्रारंभी गोरेगाव तालुक्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या विविध बचतगटांचे उत्पादित वस्तू व साहित्य विक्रीचे स्टॉलला मान्यवरांनी भेट देवून उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मार्केटींगबाबत माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाला जवळपास १५०० महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, योगेश वैरागडे, प्रफुल अवघड, प्रिया बेलोकर, प्रणाली कोटांगले, एकांत वरघने, तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राची कार्यकारिणी व सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले. संचालन योगीता राऊत यांनी केले.
०००००