मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा न्यायालयामध्ये आजपासून विविध कार्यक्रम

0
24

वाशिम, दि.१ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत १ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परिसंवाद, व्याख्याने व कवी संमेलन आदी कार्यक्रमांचा समावेश असून जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्र. ५ येथे दुपारी २ ते ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत हे कार्यक्रम होणार आहेत.

  आज, १ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे ‘मराठी भाषेचा कार्यालयीन कामकाजातील वापर’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अनिल कावरखे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, वाशिमचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया आदी उपस्थित राहणार आहेत.

२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजस्थान आर्य कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ. विजय जाधव व मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विष्णू लांडे या परिसंवादामध्ये सहभागी होतील.  ३ जानेवारी रोजी काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कवी डॉ. विजय काळे, उज्ज्वला मोरे, चाफेश्व्र गांगवे आदी सहभागी होणार आहेत.

४ जानेवारी रोजी ‘मराठी भाषा आणि आपण’ या विषयवरील प्रा. गजानन वाघ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ५ जानेवारी रोजी प्रा. लता जावळे यांचे ‘मराठी साहित्यामध्ये स्त्री साहित्यिकांचे योगदान’ या विषयावर तर ७ जानेवारी रोजी प्रा. डॉ. किरण वाघमारे यांचे ‘वाचन संस्कृती आणि आपण’ या विषयावरील व्याख्यान होईल. ‘मराठी भाषा आणि संत साहित्य’ याविषयावरील किसन गंगावणे यांचे व्याख्यान ८ जानेवारी होणार आहे.

९ जानेवारी रोजी आयोजित कवी संमेलनामध्ये मोहन शिरसा, प्रा. सुनिता अवचार, महेंद्र ताजणे, गजानन फुसे हे कवी सहभागी होणार आहेत. १० जानेवारी रोजी प्रा. धोंडूजा इंगोले यांचे ‘शासकीय कामकाजात पारिभाषिक शब्दावलीचे महत्व’ या विषयावरील व्याख्यान होणार आहेत. तसेच ११ जानेवारी रोजी कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पांडुरंग मोरे व राजेश ठवकर हे आपल्या कथा सादर करतील. १४  जानेवारी ‘मराठी भाषा आणि आजचे शिक्षण’ या विषयावर प्रा. हरिभाऊ क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत. १५ जानेवारी रोजी ‘काव्याग्रह’ नियतकालिकाचे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी हे ‘मराठी भाषेमध्ये नियतकालिकांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करतील.