युथ ऑयकॉन विश्‍वास नागरे पाटील युवकांशी साधणार संवाद

0
12

चंद्रपूर,दि.15ः-महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला संवाद साधणार आहेत. या आयोजनाची जय्यत तयारी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सुरू असून या स्पर्धा परीक्षा महोत्सवामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे.
सोळा तारखेला विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दिवसभराच्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. मिशन सेवा अंतर्गत सध्या जिल्ह्यामध्ये दर रविवारी सराव पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्या जाते. हजारो विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतात. यापूर्वी युथ एम्पावरमेंट समिट घेतले होते. त्यामध्ये ३८ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले. यापैकी पाच हजार विद्यार्थ्यांना ५२ कंपन्यांनी आपापल्या आस्थापनावर नोकरी दिली आहे. आदिवासीबहुल समजल्या जाणार्‍या या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या या प्रतिसादाला एक सामूहिक शक्तीचे स्वरूप देण्याचे काम ना.मुनगंटीवार मिशन सेवाच्या माध्यमातून करत आहेत.