वीजदेयकावर छापला मुलाचा फोटो- महावितरणचा प्रताप

0
11
सुरेश भदाडे
गोंदिया.दि.15- महावितरणचा भोंगळ कारभार तसाही नित्याचा भाग बनला आहे. वीज देयकांतील अनियमिता ही नेहमी ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आली आहे. असाच आणखी एक प्रकार पुन्हा उजेडात आला आहे. वीज देयकावर मीटरचा फोटो छापून येणे, हे अपेक्षित असताना त्याऐवजी एका मुलाचा फोटो छापून महावितरणने आपण आपल्या कामात किती तत्पर आहोत, हे पुन्हा दाखवून दिले आहे.
आज दैनंदिन जीवनात विजेचे महत्त्व फारच वाढले आहे. त्यामुळे विजेची खपत आणि विजग्राहक यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. असे असले तरी वीजमंडळाचा कारभार आणि तांत्रिक बाबी ह्या वीज ग्राहकांच्या समजण्यापलिकडच्या असतात. त्यात भर म्हणजे ग्रामीण भागात तर वीज ग्राहक जागरूक नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक वेळा उत्तम दर्जाची वीज मिळत नसताना वा अखंड सेवा पुरविली जात नसताना सुद्धा ग्राहकांना महावितरणची दिलेली विजबिले भरावी लागतात. विजेचे मीटर वाचन करणारी प्रणाली करत असलेल्या चुकांचे भूर्दंड हे ग्राहकालाच सहन करावे लागतात. निरक्षर वीज ग्राहकाला तर अधिकारी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता अनेकदा हाकलून लावत असल्याची अनेक प्रकरणे ग्रामीण भागात ऐकावयास मिळतात.
महावितरणच्या देवरी विभागाअंतर्गत येणाऱ्या आमगाव परिसरातील एका विजग्राहकाला दिलेल्या माहे डिसेंबरच्या देयकात मीटरच्या ऐवजी एका मुलाचा फोटो छापून आलेला आहे. वीज मीटर आणि त्या मुलाचा संबंध नसताना अशी चूक होण्याचे कारण नव्हते. या एका प्रकरणावरून महावितरणचा बिलिंग विभाग किती कार्यतत्पर आहे, हे सिद्ध होत आहे. अशा सदोष बिलाचे अनेक किस्से सुद्धा वीज मंडळाच्या वर्तुळात ऐकायला मिळतात. चुकीची बीलिंग सिस्टममुळे ग्राहकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागतो. याबाबत माहिती घेतली असता काही अधिकारी हे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देण्यासाठी त्यांना अतिरिक्त काम करण्यास बळजबरी करीत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. वीजग्राहक तक्रार घेऊन कार्यालयात आल्यास त्याला योग्य वागणूक न देणे, मोठमोठाल्या तांत्रिक संज्ञा सांगून वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखविणे असले प्रकार सर्रास सुरू असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांचा बळी महावितरणचे अधिकारी घेत असल्याचा आरोप वीजग्राहकांनी केला आहे.