अपघातानंतर संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रकला लावली आग

0
12

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.१६: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे आज सकाळच्या वेळी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला जबर धडक दिल्याने ८ जण जागीच ठार झाल्याची घटना ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रकला लाग लावून पेटवून दिले. मृतकांमध्ये मंजू करपे (४८, अधिपरिचारिका ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली), शामला प्रभाकर डोंगरे (४७ अहेरी कोर्टात लिपीक), प्रकाश पत्रूजी अंबादे (४८ अहेरी वनविभाग कर्मचारी)  व अमोल गावडे,( वर्ग १० वा) यांचा समावेश आहे.तर १० जण गंभीर, तर २९ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

आज सकाळी एमएच ४०- एक्यू-६०३४ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस विद्यार्थी व अन्य प्रवाशांना घेऊन एटापल्ली येथून आलापल्लीकडे जाण्यास निघाली. बसमध्ये ५० प्रवासी होते. गुरुपल्ली गावाजवळ बस पोहचताच समोरुन येणाऱ्या एमएच ३१ सीक्यू ३३८६ क्रमांकाच्या ट्रकने बसला जबर धडक दिली. यात ८ जण जागीच ठार झाले. त्यात ३ शाळकरी विद्यार्थिनींचाही समावेश आहे. जखमींना अहेरी व चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रक पेटवून दिले,  घटनास्थळी अजूनही तणाव आहे.