मतदार हा लोकशाहीचा आधार: जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे 

0
17
जिल्हयात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया,दि.२६ :: मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणूकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करुन निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक आहे असे संबोधन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी 25 जानेवारी 2019 रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ या दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे  आयोजित कार्यक्रमात उपस्थितांचे मार्गदर्शन करातांना केले.
पुढे ते म्हणाल्या की मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता @1950 टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्रमांकावर फोन करुन मतदारांनी आपल्या समस्या सोडवावे असे आवाहन त्यांनी या ठिकाणी केले. सदर क्रमांक @1950 टोल फ्री असून बी.एस.एन.एल लेंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. आणि लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविध उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच मतदारांनी तहसिल कार्यालय, बी.एल.ओ तथा www.nvsp.in  या संकेत स्थळावर भेट देऊन माहिती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
  राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे जिल्हायातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात आज सकाळी प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आले. त्यांनतर इंदिरागांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्हयात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आदिचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3.00 वा. जागरुक मतदार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमात जि.प. मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सु‍निल कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तह. राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहा.अधिक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते.सदर कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून  जागरुक मतदार नाट्यचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जि.आ.व्य.अधिकारी राजन चौबे यांनी केले तर निवडणूक ना.तह हरीशचंद्र मडावी यांनी मानले.