भंडारा जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर – ना. महादेव जानकर

0
17

 प्रजासत्ताक दिन साजरा
भंडारा,दि. 26 :- गेल्या चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. भंडारा जिल्हा हा वनाचा व तलावांचा जिल्हा आहे. समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल जंगल आणि जमीन संवर्धन, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भरण प्रकल्प यावर आधारित जिल्हयाचा विकास करण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने कृषी विकास, दुग्ध उत्पादन, रेशीम विकास, मत्स्यव्यवसाय, रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात भरीव कार्य करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. शासनाने मागील चार वर्षात जिल्हयाच्या विकासाला गती दिली असून या पुढेही जिल्हा विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 69 वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सभारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे,नगराध्यक्ष सुनिल मेंढे उपस्थित होते.
ना. महादेव जानकर पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने सर्वात मोठी कर्जमाफी योजना जाहिर केली आहे. या योजनेत भंडारा जिल्हयातील 82 हजार 710 शेतकरी सभासदांना 243 कोटी 16 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे.
जलयुक्त शिवार या या अभियानात जिल्हयामध्ये मागील तीन वर्षात 201 गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणांनी मिळून पूर्ण केलेल्या कामामुळे 47 हजार 922 टिसीएम पाणी साठी निर्माण झाला असून त्यामधून जिल्हयातील एकूण 39 हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. मागील तीन वर्षात पूर्ण झालेल्या कामावर 90 कोटी 43 लक्ष 87 हजार निधी खर्च झाला आहे. 2018-19 मध्ये 140 गावांची निवड करण्यात आली असून प्रशासनाने 69 कोटी 4 लाख रुपयाचा आराखडा तयार केला आहे. 2227 कामे प्रस्तावित असून 9 हजार 400 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे लक्ष निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कृषिपंप योजनेअंतर्गत मागील पाच वर्षात जिल्ह्यातील 7 हजार 956 कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, सौर कृषिपंप ऊर्जीकरण योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजना, तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ऊर्जा विकासाला गती मिळाली आहे. सौर उर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे शासनाचे धोरण असून नागरिकांनी वीज बचतीचा मार्ग अवलंबून सौर उर्जेचा वापर करावा, असे आवाहन ना. जानकर यांनी केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हयात 2 लाख 10 हजार 567 कुटूंबानी रोजगार मिळण्यासाठी नोंदणी केली असून या नोंदणीकृत कुटूंबाना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले आहे. सन 2018-19 डिसेंबर अखेरपर्यंत 1 लाख 31 हजार 120 कुटूंबातील 2 लाख 83 हजार 338 मजूरांना मागणीनूसार स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावर 79 कोटी 48 लाख 13 हजार रुपये खर्च झाला आहे, असे ते म्हणाले.
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या उपलब्ध जलसाठयाचा उपयोग मत्स्यव्यवसायासाठी करण्यात येत आहे. मत्स्यजीरे उत्पादनात राज्यात जिल्हा अग्रेसर असून यावर्षी मच्छीमार सहकारी संस्था आणि शिवणीबांध येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राद्वारे डिसेंबर अखेर 18 कोटी 85 लक्ष मत्स्यजीरे निर्मिती केली आहे. या उपलब्धीसाठी त्यांनी विभागाचे अभिनंदन केले.
2022 पर्यंत सर्वांना घरे या अंतर्गत 2017-18 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये 7 हजार 160 लाभार्थ्यांना, रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 6 हजार 87 व शबरी आदिवासी घरकुल अंतर्गत 120 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. सन 2017 -18 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत भंडारा शहरातील तथा तुमसर शहरातील 364 असे एकूण 907 घरकुलांना मंजूरी दिली आहे. सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2 हजार 927 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु असून प्रत्येक गरजु व्यक्तींना घरकुलाचा लाभ मिळेल याची काळजी प्रशासन घेत असल्याचे जानकर म्हणाले.
यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी पथक व विद्यार्थ्यांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. निवडणूक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस विभाग, रेशीम कार्यालय, पाणी पुरवठा व स्वच्छता, कुष्ठरोग जनजागृती , जलयुक्त शिवार, मोफत व सक्तीचे शिक्षण, जनावरांसाठी पौष्टिक आहार, अपारंपारिक उर्जेचा वापर व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण जनजागृती, हेल्मेट सक्ती, विद्युत विभाग, उडान, फिरते पोलीस स्टेशन, या विषयावर चित्ररथ काढण्यात आले. विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.