जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री संजय राठोड

0
5

वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाशिम, दि. २६ : आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची निवड झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांतर ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक संजय डोईफोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासहस्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार बांधव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये ३ हजार १२३ कामांपैकी ३६२ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक कृषि विषयक योजना राबविण्यात येत आहेत. जागतिक बँकेच्या सहाय्याने जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदलविण्याची क्षमता असलेला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प जिल्ह्यातील १४९ गावांत राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

राज्य शासनाने जिल्ह्यातील रिसोड तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि मानोरा तालुक्यातील उमरी मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या तालुक्यातील व मंडळातील शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती लागू करण्यासह दुष्काळी उपाययोजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. दुष्काळग्रस्त भागातील लोकांकडून येणारी वाढती कामाची मागणी लक्षात घेता आवश्यकतेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची उपलब्धता करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम २०१७ मध्ये ३३ टक्के वरील कपाशी पिकावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेवून राज्य शासनाने या वर्षात जिल्ह्यातील २३ हजार ३२३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ कोटी १७ लाख ५५ हजार ७३८ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत ३९१ गावांतील २१ हजार ५५४ पात्र कुटुंबांना स्वच्छ इंधन म्हणून गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना देखील मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगून श्री. राठोड म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार २४२ रुग्णांची तपसणी करून त्यांच्या उपचारार्थ ६१ कोटी ३६ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रेरणा प्रकल्पांअंतर्गत जिल्ह्यातील ८ हजार ७२५ शेतकरी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात कारंजा तालुक्यातील शेवती, वाई, वढवी, लोहारा व किनखेड या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या गावातील ७ हजार ९५१ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून प्रत्येक लाभार्थ्याची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीने सन २०१९-२० या वर्षाकरिता विविध विकास कामांसाठी १०२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. तसेच आकांक्षित जिल्हा अंतर्गत २५ कोटी रुपयांच्या आराखड्यास देखील मंजूरी प्रदान केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे श्री. राठोड म्हणाले. तसेच महसुली कामात गतिमानत यावी व शेतीशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक तत्काळ व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला जमीन मोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ५४ गावांतून जात असल्याचे सांगून श्री. राठोड म्हणाले हा महामार्ग जवळपास ९७ किलोमीटर जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गासाठी सरळ खरेदीद्वारे ९४३ हेक्टर जमीन खरेदी केली असून या जमिनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना ४४६ कोटी ६७ लक्ष रुपये, तर भूसंपादनाद्वारे संपादित केलेल्या ११० हेक्टर जमिनीसाठी १२८ कोटी ८३ लक्ष रुपये जमिनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प कर्ज योजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.

प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असल्याचे सांगून ते म्हणाले, विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. लोकशाही विकेंद्रीकरणाची कास धरणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचे हे १५० वे जयंती वर्ष आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणाऱ्या ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. हे लक्षात घेता या वर्षामध्ये व त्यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून सहभाग घेणे तसेच स्वतः बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू, ‘स्मार्ट ग्राम’ ठरलेल्या सहा ग्रामपंचायती, पंचतारांकित हरित शाळा व आदर्श पर्यावरण शिक्षक पुरस्कार, दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यावेळी वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री श्री. राठोड यांनी परेड निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, बाकलीवाल विद्यालायचे एनसीसी पथक, यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, पोलीस बँण्ड पथक तसेच शिघ्र कृती दल, नगरपरिषदेचे अग्निशमन दल आदींनी मानवंदना दिली. यावेळी श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व बाकलीवाल विद्यालायच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शिरसाट यांनी केले.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. तुमराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, विजयसिंह गहिरवाल, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, वाशिमचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांची उपस्थिती होती.