सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.03– हक्काच्या सिंचनासाठी शेतकरी मागील ३५ वर्षांपासून वंचित असल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या हद्दीत येणार्‍या सुमारे २५ ते ३0 गावांत सुरू आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा व शेतकर्‍यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी शेतकरी संघर्ष कृषी समितीच्यावतीने एल्गार पुकारण्यात आला असून लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंचनाची सोय उपलब्ध न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, असा इशारा तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे सिंचन प्रकल्प म्हणून इटियाडोह धरण ओळखले जाते. या धरणातून लगतच्या गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यातही सिंचनासाठी पाणी देण्यात येते. मात्र, प्रकल्पलगतच्या बोंडगावदेवी, निमगाव, खांबी, पिंपळगाव, दाभना, पाथरी, रिठी, अरततोंडी, चान्ना, बाक्टी, खैरी, सुकडी, बाराभाटी, कुणबीटोला, ब्राह्मणटोला, सिलेझरी, देऊळगाव, बोदरा, विहीरगाव/बर्डया, डोंगरगाव, येरंडीदेवी, सावरटोला, चापटी, सरांडी, सिल्ली आदी गावे कोरडवाहू आहेत.
विशेष म्हणजे, हे प्रकल्प या गावांजवळ आहे. तरीपण रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येत नाही. हा प्रकार मागील ३५ वर्षांपासून सुरू आहे. अनेक वेळा शेतकर्‍यांनी निवेदन व आंदोलन केले.
मात्र, शेतकर्‍यांना न्याय मिळाले नाही. त्यातच आता शेतकरी संघर्ष कृषी समितीच्या माध्यमातून सिंचनाच्या पाण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सिंचनाची सोय न झाल्यास चक्क निवडणुकीवरच बहिष्कार टाकणार, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केला आहे. तेव्हा, शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर कोणता मार्ग काढतात याकडे वंचित गावांतील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.