नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे- अशोक लटारे

0
17

रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
गोंदिया,दि.05 : दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण बनले आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे योग्य पालन करावे व आपले जीवन सुरक्षीत ठेवावे. असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग वाहतूक शाखेच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, पोलीस उपअधीक्षक मैपालसिंग चांदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी विशेषत: तरुण विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
मैपालसिंग चांदा म्हणाले, युध्दामध्ये जेवढे लोक मृत्यू पावत नाही तेवढे रस्ता अपघातात मृत्यू पावतात. मृत्यूचे प्रमाण कमी व्हायला पाहिजे यासाठी नागरिकामंध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी सांगितले.मिथीलेश चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात २० अपघात स्थळ आहेत. हेल्मेट न घालणे व सीटबेल्ट न बांधणे यामुळे जास्तीत जास्त अपघात होतात. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन आपले जीवन सुरक्षीत ठेवा असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. रस्ते अपघातात सन २०१७ मध्ये भारतात १ लाख ४७ हजार ९१३ नागरिक मृत्यूमुखी पडले. गोंदिया जिल्ह्यात रस्ते अपघातात सन २०१७ मध्ये १४८ नागरिक मृत्यू पावले तर सन २०१८ मध्ये अपघातात १७८ नागरिक मृत्यू पावले. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे योग्य पालन करुन आपले जीवन सुरक्षीत ठेवावे असे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.बबन मेश्राम, नगरसेविका भावना कदम, पोलीस विभाग वाहतूक शाखेचे कर्मचारी, एन.सी.सी.चे विद्यार्थी, एन.एस.एस.चे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुजाता बहेकार यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक पोलीस निरीक्षक संजय सिंह यांनी मानले