पात्र शेतकरी कुटुंबांच्या माहिती संकलनासाठी कालबद्ध कार्यक्रम

0
25
  • जिल्हा, तालुका व ग्राम स्तरावर समित्यांची स्थापना
  • ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी होणार तयार

वाशिम, दि. ०५ :  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावर होणार आहे. याकरिता तलाठ्याच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ७ ते १० फेब्रुवारी दरम्यान ही समिती गावनिहाय पात्र खातेधारक शेतकऱ्यांची यादी तयार करणार असून १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे.

पात्र शेतकरी कुटुंबांची निश्चिती करणे आणि याकरिता राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कृषि गणना २०१५-१६ व नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाकरिता तयार करण्यात आलेली माहिती प्राप्त घेवून विहित नमुन्यात नोंद करणे. योजनेची गावात व्यापक प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात गावातील शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही माहिती संबंधितांच्या सहमतीने प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची राहणार आहे. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविल्या जातील. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबांच्या यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून पात्र शेतकरी कुटुंबांची अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान तहसीलदार कार्यालयात सादर केली जाईल.

ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारण क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पती, पत्नी आणि त्यांची १८ वर्षांखालील मुले म्हणजे एक कुटुंब असे वर्गीकरण करण्यात येणार असून १ फेब्रुवारी २०१९ रोजी खातेधारकाने धारण केलेले क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. ग्रामस्तरीय समितीने दिलेला निर्णय मान्य नसल्यास तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येईल.

उप विभागीय अधिकारी हे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर उपविभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक हे समितीचे सदस्य राहणार आहेत. तसेच तहसीलदार हे समितीचे समन्वय अधिकारी तथा नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामस्तरावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण करणे, तालुकास्तरीय विविध विभागांमध्ये या योजनेच्या दृष्टीने समन्वय साधणे व सर्व ग्राम समित्या कालबद्ध कार्यक्रमानुसार कामकाज करीत असल्याबाबत दैनंदिन आढावा घेण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीची राहणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, डीस्ट्रिक्ट डोमेन एक्स्पर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य असतील. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हे समन्वय अधिकारी तथा जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. निश्चित करून देण्यात आलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार माहिती संकलनाचा दैनंदिन आढावा घेणे, क्षेत्रीय स्तरावरील प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे, योजनेशी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी या समितीची राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.