सालेकसा नगर पंचायत कचऱ्याच्या विळख्यात

0
21
सालेकसा दि. ०५ : नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी सालेकसा नगर पंचायात पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. आमगाव खुर्द गाव नगरपंचायतीमध्ये नव्याने समाविष्ट झाल्यानंतर गावात कचरापेट्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु त्यानंतर कधी त्या कचरा पेट्या ढुंकूनसुद्धा बघितले नसल्याने त्या तुडुंब भरून कचऱ्याची घाण दुर्गंधी येत आहे. ह्या कचऱ्यामुळे नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2019 च्या नावाखाली केंद्रातर्फे नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांना विशेष निधी उपलब्ध करुन स्वच्छते बद्दल त्या निधीचा वापर करावा असे आदेश असताना सालेकसात मात्र या निधीचा गैरवापर होतोय की काय असे चित्र नजरेस पडत आहे.  सफाई कामगार उपलब्ध नसल्याने अद्याप मी कचरापेट्या स्वच्छ न झाल्याचे कारण पुढे करत नगरपंचायतीने हात झटकले आहे. आमगाव खुर्द परिसरातील जवळजवळ सर्वच कचरापेट्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. सध्या परिस्थितीत माणगाव खुर्द गावाला कोणीही जनप्रतिनिधी नसल्याने सदर जबाबदारीही नगरपंचायतीच्या प्रशासकाकडे असून त्यांनी ह्या कचरा कोंडी वर उपाय काढावा अशी मागणी जनमानसातून केली जात आहे. जर प्रशासक आमगाव खुर्दच्या विषयांवर लक्ष घालत नसतील तर आमगाव खुर्द परिसरातील नव्याने जोडलेल्या भागात निवडणूक करून आम्हाला जनप्रतिनिधी निवड करण्याचे हक्क द्यावे निदान ते तरी आमची समस्या सोडवतील से सूर गावकर्‍यांत आहेत. गावाचा विकास व्हावा ह्या आशेने आमगाव खुर्द हे गाव नगरपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट करण्यासाठी लोकांनी आग्रह केला होता परंतु सध्या स्थिती बघता पायावर धोंडा आपटल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने ह्याकडे लक्ष घालून गाव स्वच्छ करून घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.