भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब टिचकुले यांचे हृदय विकाराने निधन

0
48

भंडारा,दि.12ः- भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व पूर्ती सहकारी साखर कारखाना, देव्हाळाचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब उर्फ श्रीराम वातू टिचकुले यांचे आज मंगळवारला(दि.12) छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई येथे हृदय विकाराच्या धक्क्याने ६७ व्या वर्षी निधन झाले. ते १९७२ मध्ये नागपूर येथून बी ई मेकॅनिकल पदवी घेऊन हिंदुस्थान पेट्रोलियम, ठाणे येथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून रुजू झाले होते. स्व लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रेरणेने नोकरीचा राजीनामा देऊन सामाजिक आणि राजकीय उद्देश घेऊन आपल्या मूळ गावी केसलवाडा येथे स्थायी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते. त्यांनी भंडारा जिल्ह्यामध्ये सामूहिक कुणबी विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. पुढे त्यांनी सर्व जातींचा सामूहिक विवाह सोहळ्यास प्रोत्साहन दिले. ते भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष, लाखनी खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष होते. वैनगंगा सहकारी साखर कारखाना मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच ते प्रयोगशील शेतकरी होते, अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग ते आपल्या शेतात करीत होते तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ते करीत होते. त्यांच्या निधनाने भाजप आणि संघ परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा चंद्रशेखर व मिलिंद टिचकुले, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या दि १३ फेब्रुवारी ला त्यांचे मृतदेह मुंबई येथुन नागपूर विमानतळावर येणार असून सायंकाळी ४ वाजता त्यांच्या मूळ गावी केसलवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.