जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध-पालकमंत्री संजय राठोड

0
17
  • जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

वाशिम, दि. १४ : वाशिम जिल्ह्याची निर्मिती होवून वीस वर्षांचा काळ लोटला आहे. मागील चार वर्षाच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासोबतच अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

जिल्हात विविध योजने अंतर्गत झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व तसेच नव्याने होणाऱ्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त नवीन नगरपरिषद प्रशासकीय इमारती समोरील टेम्पल गार्डन येथे आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव मधुकर कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार निलय नाईक, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, मानोरा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष बरखा बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यांनी दिलेल्या निधीतून पूर्ण झालेल्या सुमारे २९१.४२ कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण आज झाले आहे. तसेच सुमारे ४३२.८१ कोटी रुपयांच्या नवीन कामांचे भूमिपूजन सुद्धा आज होत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून सन २०१७ च्या खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंड अळीमुळे नुकसानग्रस्त २३ हजार शेतकऱ्यांना १५ कोटी १७ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुका व इतर दोन महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना लागू करण्यात आल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना या उपाययोजनांचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २५ हजार रुग्णांना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी ६१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर-मुंबई कृषि समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याचे सांगून श्री. राठोड म्हणाले की, या महामार्गासाठी ज्यांची जमीन संपादन केली आहे, त्यांना मोठा मोबदला देण्यात आला आहे. या महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदलणार आहे. देशातील लाखो बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लोणी येथील सखाराम महाराज देवस्थानाच्या विकासासाठी देखील मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, राज्यात सुमारे ४७ टक्के लोक शहरी भागात राहत आहेत. शहरात राहणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्मितीला गती देण्यात आली आहे. त्यामुळे शहरांचा कायापालट होत आहे. वाशिम शहरात सुध्दा नगरविकास विभागाच्या अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे या शहराचे चित्र बदलले आहे. शहरी भागाच्या विकासासोबतच ग्रामीण भागाच्या विकासालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षात जलयुक्त शिवार अभियानासोबतच  सिंचनाची विविध कामे झाली आहेत. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले आहे. मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी सुद्धा त्यामुळे मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या भूमिपुत्रांसाठी शासनामार्फत उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, आज अनेक शेतकरी शेती करण्याच्या पद्धतीत नाविन्यपूर्ण बदल घडवीत आहेत. त्यांच्या संकल्पना इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये भूमिपुत्रांनी आपल्या संकल्पना मांडाव्यात. यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या संकल्पनांना २५ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

खासदार गवळी म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु असून जिल्ह्याचा विकास गतीने होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षाला ६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पैनगंगा नदीवरील बॅरेज व इतर सिंचन प्रकल्पांमुळे शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे.

प्रास्ताविकात आमदार पाटणी म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजनांसाठी करोडो रुपयांचा निधी मागील चार वर्षात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाशिम या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. वाशिम नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतून शहरात रस्ते विकासासह विविध विकास कामे झाली आहे. भूमिगत गटार योजना पूर्ण करणारी वाशिम ही विदर्भातील पहिली नगरपरिषद आहे. त्यामुळे शहरातील अस्वच्छता कमी होऊन नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला सुद्धा चालना मिळाली आहे. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे ६५० कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. तसेच यावर्षीही ग्रामीण रस्ते विकासासाठी सुमारे २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आ. पाटणी यांनी सांगितले.

आमदार मलिक, आमदार झनक यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तत्पूर्वी लोकार्पण व भूमिपूजन होत असलेल्या विविध विकास कामांच्या कोनशिलेचे तसेच नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या कोनशिलेचे व या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी भिसे यांनी केले.