स्पर्धेच्या माध्यमातून गावांत शाश्वत स्वच्छता टिकवून ठेवा – राजा दयानिधी

0
13

गोंदिया,दि.16 – स्पर्धा म्हटली की सगळेच क्रमांक पटकाविण्यासाठी जिवापाड मेहनत घेतात, हे अत्यंत चांगले ही आहे. मात्र ही मेहनत फक्त स्पर्धेपुरती न राहता गाव शाश्वत होण्याच्या दृष्टीने गावकर्‍यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा तपासणी अंतर्गत 14 फेब्रुवारी रोजी देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा या गावांची तपासणी करण्यात आली. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड, गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, सहायक गट विकास अधिकारी पांडे, तपासणी पथकातील सदस्य आरोग्य विभागाचे डॉ. मेश्राम, शिक्षण विभागाचे मालाधरी, समाजकल्याण विभागाचे  तिरपुडे, पाणी व स्वच्छता विभागाचे  भागचंद्र रहांगडाले यासह विस्तार अधिकारी पंचायत  झांमरे,पराते उपस्थित होते. याप्रसंगी शासन निर्णयाच्या परिशिष्ट 2 नुसार गावाचे मूल्यांकन करण्यात आले. गावातील पाणी गुणवत्ता व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आदींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता पडताळणी केली. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयाचे ज्ञान कितपत आहे हे जाणून घेतले. यावेळी शालेय शिक्षकांना ही त्यांनी चांगलेच फैलावर घेतले.