समाजाच्या विकासासाठी संविधानिक अधिकाराची गरज-डॉ.बोपचे

0
14

साखरीटोला,दि.19: पोवार समाज हा शेतकरी मुलक समाज असून आजही ग्रामीण भागातील खेड्यामध्ये शेतीच्या व्यवसायात गुंतलेला हा समाज शेतमालाला योग्य तो भाव मिळत नसल्याने आणि वातावरणातील अवकृपेमुळे गरिबीच्या खाईत चाललेला आहे. या समाजाचा शेतीच्या माध्यमातून विकास होण्याऐवजी नुकसानच होत चालले आहे.
आधिच्या काळात उत्कृष्ठ शेती, कनिष्ठ नौकरी असे सांगून आमच्या समाजाला नौकरीपासून वंचित ठेवण्याचे काम करण्यात आले. मात्र जर आजच्या काळात समाजाचा विकास करावयाचा असेल तर उत्कृष्ठ नौकरी हे मान्य करीत आपले अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी संविधानिक लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे. जातीच्या नावावर कुठल्याही सुख-सुविधा मिळत नसून त्या प्रवर्गाच्या नावावर मिळतात. हे हेरुनच राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या ३४० व्या कलमानुसार आपल्याला संविधानिक अधिकार दिल्याचे विचार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी व्यक्त केले.
ते क्षत्रीय पोवार समाज संघ साखरीटोला क्षेत्र (साखरीटोला, अंज़ोरा, पानगाव, कवडी, वळद, कटंगटोला, कारुटोला, तेलीटोला, जयतूरटोला, येरमडा, रामपूर व रामाटोला) द्वारा आयोजित पोवार सम्मेलन व राजाभोज जयंती कार्यक्रमात रविवारला पानगाव येथील राजाभोज मैदानावर आयोजित कार्यक्रमात शोभायात्रा शुभारंभ अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवी व गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे हे होते. उद्घाटक म्हणून पोवार महासभा जिल्हाध्यक्ष लिलेश रहांगडाले तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय पोवार महासभा संगठन सचिव खेमेंद्र कटरे, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, पोवार महासभा सदस्य नेपाल पटले, संजय पटले, पोतन रहांगडाले, मोहरलाल चौधरी, सुनील पटले, भिकू रहांगडाले, राधेलाल रहांगडाले, रमेश टेंभरे, विनोद ठाकरे, दशरथ कटरे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलतांना संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी पोवार समाजाचे प्रेरणास्थान राजाभोज यांच्या जिवनावर प्रकाश टाकत त्यांच्या सत्ताकाळात आपलाच नव्हे तर इतर समाजही सुखी होता.ते सर्वांचे राजे होते,त्यामुळे आपल्या पुरतेच राजाभोज यांना मर्यादित न ठेवता व्यापक भूमिका ठेवत आजच्या परिस्थितीनुसार आपण राज्यघटनेच्या अधिन राहुन काम करीत आहोत.राज्यघटनेमुळे आपल्याला मिळालेले सविंधानिक अधिकाराचा वापर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले.नेपाल तुरकर यांनी समाजाने आपली संस्कृती,भाषा व बोली हे टिकवून ठेवण्यासोबतच समाजहिताला आधी प्राधान्य द्यावे असे विचार व्यक्त केले.जोपर्यंत समाज संघटीत होणार नाही,तोपर्यंत आपण आपला अधिकारासाठी लढू शकणार नाही असे म्हणाले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज शरणागत यांनी केले. संचालन संदीप कटरे, मोहन बघेले यांनी केले.आभार तेजराम ठाकरे यांनी केले. आयोजनासाठी सहा -सात गावातील सर्व कमिटीसदस्यांसह समाजबांधवानी सहकार्य केले.